Join us

रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

By मनीषा म्हात्रे | Updated: October 17, 2025 07:16 IST

बंदुकीच्या धाकानंतरही प्रतिकार करणाऱ्या ज्वेलर्स मालकामुळे तिघांचा गोंधळ उडाला आणि बॅग तेथेच सोडून पळ काढला. ही त्यांची चूक पोलिसांना त्यांच्यापर्यंत घेऊन गेली.   

- मनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घाटकोपर येथील दर्शन ज्वेलर्सवर चाकू आणि बंदुकीच्या धाकात झालेल्या लुटीमागे तीन मित्रांचा कट असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यांनी दोन दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये रेकी करून टार्गेटही ठरवले होते. मात्र, अखेरच्या क्षणी दर्शन ज्वेलर्सवर त्यांची नजर पडली. त्यानंतर त्यांनी टार्गेट बदलून या ज्वेलर्सकडे मोर्चा वळवला. बंदुकीच्या धाकानंतरही प्रतिकार करणाऱ्या ज्वेलर्स मालकामुळे तिघांचा गोंधळ उडाला आणि बॅग तेथेच सोडून पळ काढला. ही त्यांची चूक पोलिसांना त्यांच्यापर्यंत घेऊन गेली.   

लूटप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी कुर्ल्यात राहणाऱ्या तनिष भैसाडे (२०) आणि कोपरीचा सुरज यादव (२०) यांना अटक केली. तर चंद्रकिरण यादव (२०) पसार आहे. भैसाडे आणि यादव हे दोघे  नामांकित कॉलेजमध्ये बी. कॉम.चे शिक्षण घेत आहेत तर चंद्रकिरण हा बारावी नापास आहे. त्याची प्रेयसी याच कॉलेजमध्ये शिक्षण घेते. तिला भेटण्यासाठी येणाऱ्या चंद्रकिरणची यादव आणि भैसाडे सोबत मैत्री झाली. त्यातूनच त्यांनी  श्रीमंत होण्यासाठी फिल्मी स्टाईलने लुटीचा डाव आखला.  

करोडपती होण्याचे स्वप्नसकाळच्या सुमारास दुकानात जास्त कोणी नसल्याने बंदुकीच्या धाकात करोडपती होण्याचे स्वप्न रंगवले. त्यांनी येथील एक मोठे ज्वेलर्सचे दुकान टार्गेट केले. मात्र, अखेरच्या क्षणाला दर्शन ज्वेलर्सवर नजर पडली. लुटीच्या वेळी सराफ दर्शन मिटकरी यांनी प्रतिकार केल्याने त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. जखमी अवस्थेतही  प्रतिकार सुरूच ठेवल्याने त्यांनी बॅग तेथेच सोडून हाती लागलेले तीन तोळे सोने घेऊन पळ काढला. यामध्ये तनिष आणि सुरज दुचाकीवर पळाले तर चंद्रकिरण पायीच दागिने घेऊन पसार झाला. 

सोडलेल्या बॅगेतून मिळाली लिंक... पोलिस उपायुक्त राकेश ओला, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी ज्ञानेश्वर खरमाटे यांच्या पथकाने तपास सुरू केला.    दुकानात सोडलेल्या बॅगेत चंद्रकिरणचे आधारकार्ड  सापडले. त्याआधारे त्याचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर पोलिस पथक हे तनिष आणि सुरजपर्यंत पोहोचले. 

लुटीनंतर गाठले घर... तनिष आणि सुरज दोघेही दुचाकीवरून ठाणे, सायन, दादर, कुर्ला, मरोळ, साकीनाका करत त्यांच्या कोपरीच्या घरीदेखील जाऊन आले. त्यानंतर ते मरोळ येथील कंपनीच्या खाली थांबले. यापैकी तनिष याच्याविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अन्य दोघांचा कुठलाही रेकॉर्ड नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Robbery planned, wrong store hit, friends caught after first theft.

Web Summary : Three friends planned a jewelry store robbery in Ghatkopar but targeted the wrong store. A struggle ensued, they fled, leaving a bag with ID. Police traced them via the ID and arrested two, revealing their motive: to become rich.
टॅग्स :गुन्हेगारी