Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जीएमएलआर' प्रकल्पबाधितांचे कांजूरच्या इमारतींत पुनर्वसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:54 IST

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्पात बाधित होणाऱ्या नागरिकांचे कांजूर पश्चिम येथे 'बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प' अंतर्गत ९०६ घरांचे बांधकाम सुरू आहे.

मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्पात बाधित होणाऱ्या नागरिकांचे कांजूर पश्चिम येथे 'बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प' अंतर्गत ९०६ घरांचे बांधकाम सुरू आहे. यापैकी दोन इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, २५२ प्रकल्प बाधितांचे मार्च २०२६ अखेरपर्यंत पुनर्वसन करण्याच्या सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत.

'जीएमएलआर'च्या टप्पा ३ अंतर्गत जूनपासून भूमिगत बोगद्याच्या कामास सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, अमरनगर येथे लॉन्चिंग शाफ्टचे काम सुरू करण्यासाठी जागेची आवश्यकता आहे.

पुनर्वसन प्रकल्पाची वैशिष्ट्ये

ठिकाण : कांजूर

बांधकामाचे क्षेत्रफळ : १०,०५० चौ.मी.

एकूण सदनिका : ९०६

क्षेत्रफळ : ३०० चौ. फूट

इमारती : ७ (तळमजला अधिक २३ मजले)

सदनिकेतील सुविधा: बैठक, शयनकक्ष (संलग्नित स्वच्छतागृह), स्वयंपाकघर.

परिसरातील सुविधा: बाजार, सामुदायिक सभागृह, वाचनालय, आरोग्य केंद्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी).

अति. आयुक्तांच्या पाहणीतील बाबी: सदनिकांमधील संरचना, पाणी, वीज, स्वच्छतागृह, लिफ्ट, पायऱ्या, अग्निसुरक्षा व्यवस्था व त्यांची गुणवत्ता.

एप्रिल २०२६ पर्यंत 'सीसी' दाखला

सातपैकी दोन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून, मार्चअखेरपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला (सीसी) मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात २५२ घरे उपलब्ध होतील. तर, उर्वरित पाच इमारतींना एप्रिलअखेरपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळणे अपेक्षित आहे.

"घरांचे बांधकाम योग्यप्रकारे आणि दर्जेदारपणे सुरू आहे. प्रकल्पबाधितांसाठी अन्य आवश्यक सोयी-सुविधांचीही वेळेत पूर्तता करावी. तसेच, सदनिकांचे बांधकाम ठरलेल्या वेळेत पूर्ण करून या सदनिका त्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्या जातील, यासाठी योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करावी."— अभिजीत बांगर,अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), मुंबई महापालिका

English
हिंदी सारांश
Web Title : GMLR Project Affected People to be Rehabilitated in Kanjur Buildings

Web Summary : 906 homes are being built in Kanjur for those affected by the GMLR project. 252 will be rehabilitated by March 2026. The project includes amenities like markets and healthcare. Two buildings are near completion, with more to follow soon.