Join us  

जूनपासून नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी; फसवणूक टाळण्यासाठी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 1:57 PM

संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राच्या परवानगीचा असा ई-मेल महारेराच्या मेलवर आलेला असल्याशिवाय नवीन प्रकल्पांची नोंदणी  महारेराला करता येणार नाही.

मुंबई : जून महिन्याच्या १९ तारखेपासून नवीन गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीपूर्वी महारेरा संबंधिताने सादर केलेले बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र संबंधित यंत्रणांकडून ई-मेलवर आलेल्या प्रमाणपत्राशी पडताळून पाहणार आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राच्या परवानगीचा असा ई-मेल महारेराच्या मेलवर आलेला असल्याशिवाय नवीन प्रकल्पांची नोंदणी  महारेराला करता येणार नाही.महारेराने नुकतेच परिपत्रक जारी करून हा निर्णय जाहीर केला आहे. हे परिपत्रक जारी करण्यापूर्वी विकासकांच्या संस्थांच्या प्रतिनिधींची मुख्यालयात बैठक घेऊन, त्यांनी याअनुषंगाने आपल्या सदस्यांना मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली आहे. नवीन गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीसाठी बिल्डरने सादर केलेल्या  स्वप्रमाणित कागदपत्रांच्या आधारे प्रकल्प नोंदणी करण्याची तरतूद स्थावर संपदा अधिनियमात आहे; परंतु गेल्यावर्षी काही बिल्डरने खोटी स्वप्रमाणित कागदपत्रे सादर करून ग्राहकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. महारेराने या प्रकल्पांची नोंदणी रद्द केली.भविष्यात असे प्रकार होऊ नयेत. महारेराला प्रकल्प नोंदणी करण्यापूर्वी कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहता यावी, यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी या परवानगी मुंबई महापालिकेप्रमाणे संकेतस्थळावर ३१ मार्चपूर्वी टाकणे अपेक्षित आहे.  

टॅग्स :मुंबईमहारेरा कायदा 2017राज्य सरकार