मुंबईत आरटीईसाठी ३६५ शाळांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 01:19 AM2020-02-13T01:19:22+5:302020-02-13T01:19:28+5:30

आरटीईसाठी ७,१६५ जागा उपलब्ध : नोंदणीच्या पहिल्याच दिवशी दाखल झाले २०० हून अधिक अर्ज

Registration of 3 schools for RTE in Mumbai | मुंबईत आरटीईसाठी ३६५ शाळांची नोंदणी

मुंबईत आरटीईसाठी ३६५ शाळांची नोंदणी

Next

मुंबई : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणाºया आरटीई प्रवेश फेरीला आज बुधवारपासून सुरुवात झाली आहे. पालकांकडून आपल्या मुलांचे प्रवेश अर्ज दुपारी ४ वाजल्यापासून भरण्यास सुरुवात झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे. मुंबईत यंदा आरटीई प्रवेशांसाठी ३६७ शाळांनी नोंदणी केली असून, एकूण ७,२०२ जागा उपलब्ध आहेत. यामधील ६५० जागा या पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी, तर पहिली इयत्तेसाठी ६,५०२ जागा यंदाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध आहेत.


आरटीईच्या जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे राज्यात ११ फेब्रुवारीपासून पालकांद्वारे विद्यार्थी नोंदणीसाठी सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, राज्यातील अनेक शाळांनी यंदा प्रवेशाच्या नोंदणीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. यामुळे ही विद्यार्थी नोंदणी १२ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली. १२ फेब्रुवारी दुपारी ३ पर्यंत ज्या शाळांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांची नोंदणी करून घेण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी आणि मुंबईतील शिक्षणाधिकारी यांना दिल्या. त्यानुसार, १२ फेब्रुवारी संध्याकाळी ७ पर्यंत राज्यातील ९,३२१ शाळांनी नोंदणी केली असून, आरटीई प्रवेशासाठी एकूण १,१५,०२७ जागा उपलब्ध झाल्या आहेत. दुपारी ४ वाजता विद्यार्थी नोंदणी सुरू झाल्यावर सायंकाळी ७ पर्यंत एकूण १,७१६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.


मुंबईत नोंदणी झालेल्या शाळांची संख्या यंदा वाढली आहे. मुंबई डिव्हायडी विभागात ७० तर पालिकेच्या २९७ शाळांनी या प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यामुळे पालिका शाळांमध्ये पूर्व प्राथमिकच्या प्रवेशासाठी ५६६ तर पहिलीच्या प्रवेशासाठी ५,२०५ जागा उपलब्ध आहेत, तसेच डिव्हायडी विभागाच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या शाळांमध्ये पूर्व प्राथमिकच्या ८४, तर पहिलीच्या प्रवेशासाठी १,३४७ जागा उपलब्ध आहेत. पहिल्या दिवशी सायंकाळी ७ पर्यंत २१८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली.


अर्जासाठी ही कागदपत्रे आवश्यक
च्निवासी पुराव्यासाठी रेशन कार्ड, वाहन परवाना, वीज, टेलिफोन बिल, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, घरपट्टी, पासपोर्ट आदी. जन्मतारखेचा पुरावा, जात प्रमाणपत्र पुरावा, उत्पन्नाचा पुरावा याची गरज लागणार आहे.
च्२०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेताना
विद्यार्थ्यांच्या पालकांचा सन २०१८-१९ किंवा २०१९-२० या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे, तसेच उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वेतन चिठ्ठी किंवा तहसीलदारांचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे.

Web Title: Registration of 3 schools for RTE in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.