Join us  

मोफत रक्तपुरवठ्याविषयी रक्तपेढ्यांनी फलक लावणे बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 5:56 AM

...अन्यथा परवाना रद्द करण्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे निर्देश

मुंबई : थॅलेसीमिया, हिमोफेलिया आणि सिकलसेल या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना वारंवार रक्त संक्रमणाची गरज असते. ही गरज लक्षात घेता, केंद्र सरकारने पुढाकार घेऊन या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने सूचना जारी केल्या होत्या. त्याचसोबत, आता रक्तपेढ्यांना या आजारांसाठी मोफत रक्तपुरवठा करण्यासंदर्भात रक्तपेढीच्या दर्शनी भागात फलक लावण्याचे आदेशही दिले आहेत. अशा रुग्णांना मोफत रक्तपुरवठा न झाल्यास, त्यासाठी शुल्क आकारल्यास, बदली रक्तदात्याची मागणी केल्यास किंवा रक्तघटक देण्यास टाळाटाळ केल्यास, त्या रक्तपेढीचे ना हरकत प्रमाणपत्र आणि परवाना रद्द केला करण्यात येईल.

राष्ट्रीय राज्य रक्त संक्रमण आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेने आदेश जारी करत परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात नमूद केल्यानुसार, प्रत्येक परवानाधारक रक्तपेढ्यांना थॅलेसीमिया, हिमोफेलिया, सिकलसेल आणि अ‍ॅनिमिया आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना रक्ताचा आणि रक्तघटकाचा मोफत पुरवठा करावा. ज्या रक्ताशी निगडित आजारात रुग्णाला जगण्यासाठी वारंवार रक्त संक्रमण करावे लागते, अशा रुग्णांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. रक्तपेढीत या ठरावीक आजारांच्या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा होत असल्याचा फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.

केंद्र शासनाच्या आदेशानंतरही काही रक्तपेढ्या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करत नसल्याचे निदर्शनास आले होते. या तक्रारींना गांभीर्याने घेत रुग्णांना मोफत रक्तपुरवठा होत असल्याचा फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक असल्याच्या सूचना सरकारने रक्तपेढ्यांना दिल्या आहेत. याविषयी, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुमेर डेमला यांनी सांगितले की, अशा रुग्णांना राज्य रक्त संक्रमण परिषदेने ओळखपत्र दिले आहे. त्यामुळे सरकारी रक्तपेढ्यांना त्यांना रक्त वा रक्तातील अन्य घटक नाकारण्याचा अधिकार नाही. तसे झाल्यास कुणाकडे तक्रार करावी, याची माहिती नसते. या निर्णयाच्या कडक अंमलबजावणीमुळे रुग्णांना निश्चितच फायदा होईल.

टॅग्स :रक्तपेढीमुंबई