अनामत रकमेचा परतावा अडकला
By Admin | Updated: July 8, 2015 02:04 IST2015-07-08T02:04:13+5:302015-07-08T02:04:13+5:30
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) मे महिन्यात काढण्यात आली. या प्रक्रियेत अर्जदारांनी अर्ज भरतेवेळी केलेल्या चुकांचा फटका सुमारे अडीच हजार जणांना बसला आहे.

अनामत रकमेचा परतावा अडकला
मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) मे महिन्यात काढण्यात आली. या प्रक्रियेत अर्जदारांनी अर्ज भरतेवेळी केलेल्या चुकांचा फटका सुमारे अडीच हजार जणांना बसला असून, त्यांना अनामत रक्कम परत मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. अनामत रक्कम न मिळालेल्या व्यक्तींना अर्जासोबत बँक खात्याची कागदपत्रे म्हाडाकडे जमा करावी लागणार आहेत.
म्हाडाच्या १ हजार ६३ घरांची लॉटरी ३१ मे रोजी काढण्यात आली. या लॉटरीतील विविध भागांतील घरांसाठी सुमारे सव्वा लाख मुंबईकरांनी नशीब अजमावले होते. यामध्ये अयशस्वी ठरलेल्या आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांच्या अनामत रकमेचा परतावा अॅक्सिस बँकेमार्फत तातडीने अर्जदारांच्या बँक खात्यावर करण्यात आला. परंतु अर्ज भरताना केलेल्या चुकांचा फटका २ हजार ४३0 जणांना बसला आहे.
बँकेचा एमआयसीआर क्रमांक, चुकीचा अकाउंट नंबर, एनआरआय अकाउंट नंबर, बंद अकाउंट अशा ६ कारणांमुळे अर्जदारांची अनामत रक्कम ईसीएसमार्फत बँक खात्यात अद्याप जमा झालेली नाही. अशा अर्जदारांची ईसीएस न होण्याच्या कारणांसह अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तसेच अर्जाचा नमुनाही या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अनामत न मिळालेल्या अर्जदारांनी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेला नमुना अर्ज भरून त्यासोबत बँक खात्याची कागदपत्रे उप मुख्य अधिकारी (पणन) मुंबई मंडळ रूम नं.२४0, पहिला मजला, गृहनिर्माण भवन, कलानगर, बांद्रा पूर्व किंवा म्हाडाच्या मित्रा कक्षात ३१ जुलैपर्यंत जमा करावीत, असे आवाहन मुंबई मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.