Join us  

बेस्ट बस तिकिटाचे दर कमी केले; पण समस्या कधी सुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 12:47 AM

प्रवाशांच्या तक्रारी : कन्झ्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियाची मोहिम

सागर नेवरेकर 

मुंबई : बेस्ट प्रशासन आर्थिक संकटात सापडल्याने नुकसान भरपाई भरून निघावी, यासाठी पाच किलोमीटर अंतरापर्यंतच्या प्रवासाचे भाडे फक्त पाच रुपये करण्यात आले. भाडेकपात झाल्यामुळे अलीकडे प्रवाशांची संख्याही वाढत आहे, परंतु बेस्ट प्रशासनाचे बसचालक व वाहक यांचे गैरवर्तन, बसथांब्याची दुरवस्था, वेळेनुसार धावत नसलेल्या गाड्या, रॅश ड्रायव्हिंग, तुरळक गाड्या, थांब्यावर प्रवासी असूनही बसगाड्या थांबविल्या जात नाहीत; अशा अनेक तक्रारी बेस्ट प्रवाशांच्या आहेत. परिणामी, केवळ बेस्ट भाडे कमी करून चालणार नाही, तर बेस्ट बसच्या फ्रिक्वेन्सीसह उर्वरित घटकांकडेही बेस्टने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत बेस्ट प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

कन्झ्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियाने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ऑनलाइन मोहीम राबविली होती. या अंतर्गत बेस्ट बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांच्या समस्या समजावून घेणे हा हेतू होता.या मोहिमेंतर्गत संस्थेकडे मुंबई शहरासह उपनगरातून बेस्टच्या समस्यांबाबत तीसहून अधिक तक्रारी दाखल झाल्या. संस्थेने या तक्रारी बेस्टकडे पाठविल्या. सीजीएसआयला बेस्ट प्रशासनाकडून सकारात्मक उत्तर अद्याप मिळाले नाही. बेस्टने प्रवाशांच्या समस्यांकडे कानाडोळा केल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.सायन येथील राणी लक्ष्मी चौकात पाच बसथांबे असून एकच बसथांबा करा. गोरेगाव पूर्वेकडील विरवानी बसथांबा हा मान्सून येण्याआधी कोसळला होता. त्याची दुरुस्ती करा. नेरूळ येथील बसथांब्यावर प्रवाशांनी हात दाखविला, तरी बसचालक बसगाड्या थांबत नाही. जोगेश्वरी पूर्वेकडील जयकोच परिसरात बसगाड्या वेळेनुसार येत नाहीत. गोरेगाव पश्चिमेकडील बस क्रमांक ३२, ३३ आणि २६१ या गाड्या आपल्या निर्धारित वेळेनुसार धावत नाहीत. चेंबूर येथे बसवाहक ऑनलाइन तिकीट नाकारतात.

घाटकोपर येथे वेळेनुसार बसगाड्या धावत नाही. मानखुर्द येथील चालकाची बसगाडी चालविताना बेपर्वाई, तसेच बसचालक आणि वाहक यांचे प्रवाशांसोबत गैरवर्तणूक करतात. कुर्ला येथील अंजना मगर बसथांबा इथे २२, २५, ३४१, ४११ या गाड्या तासभर उशिराने येतात, अशा प्रकारच्या तक्रारी बेस्ट प्रवाशांनी सीजीएसआयकडे ऑनलाइन स्वरूपात केल्या आहेत.२५ ते ३० तक्रारी प्रशासनाच्या विरोधातकन्झ्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डॉ. मनोहर कामत यांनी याबाबत सांगितले की, सीजीएसआयकडे मुंबईतील विविध भागातील प्रवाशांच्या २५ ते ३० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बेस्ट प्रशासनाकडे या सगळ््या तक्रारी पाठविण्यात आल्या असून, त्यावर निवारण आम्ही देणार नाही, असे बेस्ट प्रशासन म्हणत आहे. सीजीएसआय ही संस्था मान्यता प्राप्त असून, ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत आहेत. प्रवाशांच्या समस्या आम्ही नाही मांडल्या, तर कोण मांडणार आणि त्यांना न्याय कसा मिळणार? बेस्ट प्रशासनाने दिलेल्या उत्तरामुळे आम्ही नाराज आहोत. बेस्ट प्रशासन प्रवाशांच्या समस्याचे निराकरण करत नाही. म्हणून प्रवासी आमच्याकडे तक्रारी घेऊन येतात. बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या तक्रारीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

टॅग्स :बेस्ट