Join us  

कामगार कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार केला कमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 6:55 PM

Labor Welfare Commissioner : कामगार कल्याण आयुक्तपदी वर्ग १ च्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती

मुंबई : राज्य सरकारच्या कामगार विभागाने कामगार कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार केला कमी करून कामगार कल्याण आयुक्तपदी वर्ग १ च्या अधिकाऱ्याची नुकतीच प्रतिनियुक्ती केली आहे. 

कामगार कल्याण मंडळाचा आयुक्त पदाचा (वर्ग १) अतिरिक्त कार्यभार (वर्ग ३) चे कनिष्ठ अधिकारी सहाय्यक कल्याण आयुक्त (निधी) महेंद्र तायडे यांना दिल्यामुळे कामगार कल्याण अधिनियम १९५३ आणि अतिरिक्त कार्यभार देण्याबाबतच्या शासन निर्णयाचा भंग होऊन मंडळात घडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामगार निधीच्या भ्रष्टाचाराबाबत गेल्या डिसेंबरच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी लक्षवेधी  मांडली होती. तायडे यांची मंडळातील मुळ नियुक्ती बोगस असून मंडळाच्या सेवेतून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी प्रभू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

राज्य सरकारच्या कामगार विभागाने या प्रकरणाची दखल घेत २२ ऑक्टोबरच्या आदेशानुसार महेंद्र तायडे,सहाय्यक कल्याण आयुक्त (निधी) या वर्ग ३ च्या कनिष्ठ अधिकाऱ्याचा कामगार कल्याण आयुक्त पदाचा त्यांना दिलेला अतिरिक्त कार्यभार कमी करून कामगार कल्याण आयुक्त पदी कामगार कल्याण अधिनियम १९५३ मधील तरतूदीनुसार वर्ग १ चे कामगार उपायुक्त रविराज इळवे यांची प्रतिनियुक्ती केली आहे.

सिटीजन्स जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र संघटनेचे सरचिटणीस रफिक मुलाणी यांना  संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, कामगार विभागाने नियमाने कल्याण आयुक्त पदावर वर्ग १ चे कामगार उपायुक्त रविराज इळवे प्रतिनियुक्ती करून कायद्याची अंमलबजावणी केली, परंतू महेंद्र तायडे यांची मूळ नियुक्ती बोगस असणे, कामगार हिताच्या नसलेल्या एन.आय.टी प्रकल्पासाठी बेकायदा १० कोटी रुपये अदा करणे आणि मंत्री (गृह) यांच्या आदेशाने तायडे व त्यांच्या कुटुंबियांची प्रलंबित अपसंपदा चौकशी इत्यादी गंभीर तक्रारींबाबत चौकशी प्रलंबित असताना कामगार विभागाने त्यांना उपकल्याण आयुक्त पदाचा बेकायदेशीरपणे अतिरिक्त कार्यभार देऊन त्यांच्या गैरकारभारा संदर्भात तायडे यांना एकप्रकारे बक्षिसच दिल्याची प्रतिक्रीया दिली. 

महेंद्र तायडे यांचे सहाय्यक कल्याण आयुक्त (निधी) हे पद लेखा संवर्गातील असून एकाकी पद आहे, त्यामुळे तायडे यांना लेखा व लेखा परीक्षा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देणे नियमात बसते, अतिरिक्त कार्यभार देण्याबाबतचा शासन निर्णय डावलून तायडे यांना पुन्हा शासनाने उपकल्याण आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला हे आश्चर्यकारक असल्याचे मुलाणी यांनी शेवटी म्हटले आहे. 

टॅग्स :सरकारमहाराष्ट्रमुंबई