पाच सखल ठिकाणे पूरमुक्त करा - आयुक्त
By Admin | Updated: April 3, 2016 03:52 IST2016-04-03T03:52:18+5:302016-04-03T03:52:18+5:30
हमखास पाण्याखाली जाणारी ठिकाणे यंदाच्या पावसाळ्यात तुंबू नयेत, याची खबरदारी घेण्याची ताकीदच पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सर्व साहाय्यक आयुक्तांना दिली आहे़ यासाठी कृती

पाच सखल ठिकाणे पूरमुक्त करा - आयुक्त
मुंबई : हमखास पाण्याखाली जाणारी ठिकाणे यंदाच्या पावसाळ्यात तुंबू नयेत, याची खबरदारी घेण्याची ताकीदच पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सर्व साहाय्यक आयुक्तांना दिली आहे़ यासाठी कृती आराखडा तयार करून दरवर्षी तुंबणारी पाच ठिकाणे पूरमुक्त करण्याचे लक्ष्यच त्यांनी अधिकाऱ्यांपुढे ठेवले आहे़
मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक बोलाविली होती़ या बैठकीत उपायुक्त व संपूर्ण २४ वॉर्डचे साहाय्यक आयुक्त उपस्थित होते़ या वेळी चर्चेदरम्यान सायन रोड क्ऱ २४, किंग्जसर्कल, कुर्ला शेल कॉलनी, दादर येथील हिंदमाता, अंधेरी येथील मिलन सब-वे ही पाच ठिकाणे पावसाळ्यात हमखास पाण्याखाली असतात, असे समोर आले़
हे रस्ते प्रमुख असल्याने या परिसरात पाणी साचल्यावर संपूर्ण मुंबईतील वाहतुकीवर परिणाम होतो़ किंग्जसर्कल आणि हिंंदमाता परिसरात पाणी तुंबल्यानंतर पूर्व उपनगरात ठाणे व नवी मुंबईतून दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होतो़
हे पाणी उपसण्यासाठी बसविलेले उच्च क्षमतेचे पंपही अशा वेळी कुचकामी ठरतात़ त्यामुळे ही पाच ठिकाणे पूरमुक्त ठेवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत़ (प्रतिनिधी)
कोणती पाच ठिकाणे
दादर येथील हिंदमाता, किंग्जसर्कल गांधी मार्केट, सायन रोड नं़ २४, कुर्ला पूर्व शेल कॉलनी, अंधेरी येथील मिलन सब-वे़
आयुक्तांनी दिली ताकीद
आव्हान स्वीकारा आणि हवे ते करा, पण या भागात पाणी साचू देऊ नका़ त्यासाठी कृती आराखडा तयार करा, अशी ताकीद आयुक्तांनी संबंधित वॉर्डांतील साहाय्यक आयुक्तांना दिली आहे़