रोस्टरअभावी जि.प.तील भरती रखडली
By Admin | Updated: May 11, 2015 01:22 IST2015-05-11T01:22:21+5:302015-05-11T01:22:21+5:30
जिल्हा विभाजन होऊन नऊ महिने झाले तरी अद्यापही या दोन्ही जिल्हा परिषदांचा कर्मचारी आकृतीबंध (रोस्टर) स्वतंत्ररित्या करण्यात आलेला नाही.

रोस्टरअभावी जि.प.तील भरती रखडली
सुरेश लोखंडे, ठाणे
जिल्हा विभाजन होऊन नऊ महिने झाले तरी अद्यापही या दोन्ही जिल्हा परिषदांचा कर्मचारी आकृतीबंध (रोस्टर) स्वतंत्ररित्या करण्यात आलेला नाही. तो होत नाही तोपर्यंत या दोन्ही जिल्हा परिषदांसाठी कर्मचाऱ्यांची भरती करणे शक्य नाही. या तांत्रिक अडथळ्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची सरकारी नोकरीची संधी वर्षभर लांबणीवर पडणार आहे.
विविध विभागांमधील दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याचे नियोजन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात येते. पण, स्वतंत्र रोस्टरअभावी ते या वर्षी होणार नसल्याचे संकेत आहेत. साधारणत: एप्रिल महिन्यात रिक्त पदांचा आढावा घेतला जातो. त्यानंतर, पदे भरण्याची प्रक्रिया सुरू होते. पण, विभाजनानंतर ठाणे व पालघर जिल्ह्यासाठी कर्मचारी भरतीचे रोस्टर अद्याप निश्चित झालेले नाही.
जुन्या रोस्टरनुसारच या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये सध्या कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात कर्मचाऱ्यांकडून कोणत्या जिल्ह्यात सेवा द्यायची, हा विकल्पही घेण्यात आल्यामुळे सध्या पालघरमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी मोठ्या संख्येने ठाणे जिल्ह्यात येणार आहेत. यामुळे तेथील कर्मचारी संख्या कमी होणार आहे. पण, रोस्टरअभावी ते निश्चित होणे अवघड असल्यामुळे भरती प्रक्रिया रखडल्याचे वास्तव आहे.
पालघर जिल्हा परिषदेसाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, तर पालघरमध्ये आधीच कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्या कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी नियुक्त करण्यात आले. त्यात, पेसा कायद्यानुसार मागील वर्षी जून महिन्यात आदिवासी भागातील रिक्त पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर, आदिवासी तालुक्यांतील पदेही पदोन्नतीवर भरण्यात आली होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात अनेक पदे रिक्त झाली. मात्र, सध्या रोस्टर नसल्यामुळे जिल्ह्यात नक्की किती पदे रिक्त आहेत, याची निश्चित संख्या अद्याप उपलब्ध नाही.
राज्य सरकारने पालघर जिल्हा परिषदेला कंत्राटी पद्धतीने आवश्यक पदांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यात रिक्त पदांवर उमेदवारांची मोठी भरती शक्य आहे. याशिवाय, विकल्पामुळे या जिल्ह्यातील कर्मचारीवर्ग ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येणार आहे. यामुळे ठाणे जिल्हा परिषदेत फारशा जागा रिक्त राहणार नाहीत, पण दोन्ही जिल्हा परिषदांचे रोस्टर वेगवेगळे करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रोस्टर वेगळे करण्याची गरज आहेच, पण विकल्पामुळे पालघरमधील बहुतांशी कर्मचारी ठाणे जिल्हा परिषदेत वर्ग होणार आहेत. त्यात शिक्षक मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे ठाणे जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची फारशी भरती होणार नाही. पण, या वर्षाची भरती नोव्हेंबरमध्ये करण्याचे राज्य शासनाचे आदेश आलेले आहेत. त्यानुसार, राज्यात एकदम भरती होणार आहे
- रवींद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे
काय आहे, नेमकी स्थिती
४राज्य सरकारने पालघर जिल्हा परिषदेला कंत्राटी पद्धतीने आवश्यक पदांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यात रिक्त पदांवर उमेदवारांची मोठी भरती शक्य आहे.
४याशिवाय, विकल्पामुळे या जिल्ह्यातील कर्मचारीवर्ग ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येणार आहे. यामुळे ठाणे जिल्हा परिषदेत फारशा जागा रिक्त राहणार नाहीत, पण दोन्ही जिल्हा परिषदांचे रोस्टर वेगवेगळे करण्याची गरज निर्माण झाली आहे.