विनाअनुदानित शाळांची फेरतपासणी
By Admin | Updated: March 15, 2015 00:56 IST2015-03-15T00:56:56+5:302015-03-15T00:56:56+5:30
विनाअनुदानित शाळांची फेरतपासणी थांबविली असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान सभेत दिली होती.
विनाअनुदानित शाळांची फेरतपासणी
तेजस वाघमारे ल्ल मुंबई
विनाअनुदानित शाळांची फेरतपासणी थांबविली असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान सभेत दिली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर व उल्हासनगरमधील शाळांची फेरतपासणी सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने शिक्षण मंत्र्यांनी विधान सभेत दिलेली माहिती आश्वासनच ठरल्याने शाळा कृती समिती आक्रमक झाली आहे.
या पूर्वी झालेल्या मूल्यांकनानुसार शाळांना अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीने आंदोलन सुरू केले आहे. शिक्षकांनी दहावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्याने शुक्रवारी आमदारांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी विना अनुदानित शाळांची फेरतपासणी थांबविण्यात आल्याची माहिती दिली होती. पण हे आश्वासन केवळ ह्यबोलाचीच कढीह्ण ठरली.
शिक्षण अधिकाऱ्यांनी शनिवारी ठाणे जिल्ह्यातील शाळांची फेरतपासणी केली. फेरतपासणी थांबविण्याच्या संदर्भात कोणतीच माहिती नसल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला.
शाळांचे मूल्यांकन तातडीने पूर्ण न केल्यास अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल, असे आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. शासनाने सोपविलेली जबाबदारी पार पडत असल्याचे, एका शिक्षण अधिकाऱ्याने सांगितले.
शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे शाळांची फेरतपासणी थांबलेली नाही. त्यामुळे दहावी पेपर तपासणीवरील बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या कार्यकारणीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे, समितीचे मुंबई विभागीय अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले.