मुंबई : मुंबई महापालिकेतील विविध खात्यांतील ५६ हजार रिक्त पदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येतील, असे आश्वासन मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना दिले.महापालिकेतील विविध खात्यांतील कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत डॉ. जोशी यांच्या दालनात ही बैठक झाली. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी यावेळी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडले. राज्य सरकारच्या धोरणानुसार सफाई, मलनिस्सारण, गटारे, स्मशानभूमी आदी ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क नोकऱ्या दिल्या जाणार असल्याची माहितीही यावेळी जोशी यांनी दिली.
उपायुक्तांसह अधिकारी उपस्थितया बैठकीस उपायुक्त किशोर गांधी, किरण दिघावकर, प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे, प्रमुख कर्मचारी अधिकारी शारदा गोसावी, प्रमुख लेखापाल, तसेच युनियनच्या वतीने खजिनदार महेंद्र पवार आणि मंदार गावकर उपस्थित होते.
दावे निकाली काढणार नवीन पेन्शन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मागील दोन वर्षांपासून रखडलेले डीसी-१ देय दावे निकाली काढण्यासाठी सुधारित व सोपी नियमावली तयार करून लवकरच प्रसारित केली जाईल, असेही जोशी यांनी सांगितले. ‘केईएम’मध्ये २६ वर्षे सेवा, कर्मचाऱ्यांची बदली एका जागी अनेक वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदलीसंदर्भात पुढाकार घेतला आहे. सफाई खात्याच्या पी. टी. केस विभागातील तीन लिपिक आणि केईएम रुग्णालयात २६ वर्षे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश जारी करण्यात आले. बदलीच्या परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी प्रशासनाने मान्य केली आहे, अशी माहिती डॉ. बापेरकर यांनी दिली.