Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मालकांकडून अडीच लाखांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 00:45 IST

पाळीव प्राण्यांची विष्ठा रस्त्यावरच सोडून जाणाऱ्या ४६० नागरिकांवर महापालिकेने कारवाई केली आहे.

मुंबई : पाळीव प्राण्यांची विष्ठा रस्त्यावरच सोडून जाणाऱ्या ४६० नागरिकांवर महापालिकेने कारवाई केली आहे. या कारवाईतून पाळीव प्राण्यांच्या मालकांकडून अडीच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.मुंबईत चौपाटी, समुद्रकिनारा या ठिकाणी नागरिक आपल्या पाळीव प्राण्यांना फिरण्यासाठी घेऊन येतात. अनेक वेळा या प्राण्यांची विष्ठा साफ न करताच त्यांचे मालक निघून जातात. याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला होता. त्यानुसार, रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या कारवाईअंतर्गत परळ, माटुंगा, अंधेरी, महालक्ष्मी, नाना चौक येथील नागरिकांना दंड करण्यात आला आहे. के. पश्चिममध्ये ६१ लोकांवर कारवाई करून ३० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला, तर परळमध्ये ६५ लोकांकडून ३२ हजार ५०० रुपये, माटुंगा येथून ८४ लोकांकडून ४१ हजार रुपये दंड, तर महालक्ष्मी, ताडदेव येथून ५२ लोकांकडून २६ हजार रुपये दंड अशा प्रकारे अन्य विविध ठिकाणी कारवाई करून सुमारे अडीच लाखांचा दंड वसूल करण्यात आला.