व्यापा-यांकडून ‘वसुली’
By Admin | Updated: August 14, 2014 01:09 IST2014-08-14T01:09:45+5:302014-08-14T01:09:45+5:30
कामोठे वसाहतीत नाक्यानाक्यावर गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे

व्यापा-यांकडून ‘वसुली’
प्रशांत शेडगे, पनवेल
कामोठे वसाहतीत नाक्यानाक्यावर गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारीवर्गावर वर्गणीचा भार पडत असून मोठमोठ्या रकमांसाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे कमाई मूठभर आणि वर्गणी हातभर अशी स्थिती निर्माण झाल्याने दुकानदार त्रस्त झाले असून गणेश मंडळांच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. याबाबत पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना लगाम घालावा, असे व्यापारीवर्गाचे म्हणणे आहे.
मानसरोवर आणि खांदेश्वर रेल्वेस्थानक व पनवेल-सायन महामार्गालगत असलेल्या कामोठे वसाहतीतील जवळपास सर्व सेक्टर विकसित झाले आहेत. येथील लोकवस्ती ही दीड लाखांच्या आसपास पोहचली असून या ठिकाणी मिनी मॉल्स, शोरूम, दुकानांची संख्याही मोठी आहे. त्याचबरोबर गणेशोत्सव मंडळेही वर्षागणिक वाढत आहेत. नाक्यानाक्यावर गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. चार पाच जण एकत्र येऊन गणपती बसवतात आणि पावती पुस्तक घेऊन दुकानदारांकडे वर्गणी मागतात. काहीजणांकडून वर्गणी देण्याची सक्तीही केली जाते. ऐच्छिक रक्कम न घेता काही गणेश मंडळांचे कार्यकर्ते अव्वाच्या सव्वा रकमेसाठी तगादा लावतात. शिवाय परिसरातील पाच सहा मंडळांकडून ही वर्गणी वसूल केली जात असल्याचे काही व्यापाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. काही मंडळे मनाप्रमाणे वर्गणी न दिल्याने व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्रासही देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सध्या मार्केटमध्ये मंदी असून व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे जमाखर्चामध्ये ताळमेळ बसवता बसवता दुकानदारांच्या नाकीनऊ येत आहे. त्यातच वर्गणीचा भार झेलावा लागत असल्याने व्यापारी चिंतेत आहेत. गणपतीच्या नावावरील वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.