२७ दिवसांत १४८ कोटी वसूल
By Admin | Updated: January 29, 2015 23:36 IST2015-01-29T23:36:04+5:302015-01-29T23:36:04+5:30
पालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी आता नव्या वर्षात पुन्हा बसण्यास सुरुवात झाली आहे. नव्या आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वच विभागांना

२७ दिवसांत १४८ कोटी वसूल
ठाणे : पालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी आता नव्या वर्षात पुन्हा बसण्यास सुरुवात झाली आहे. नव्या आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वच विभागांना वसूलीच्या बाबतीत कडक निर्देश दिले असून जे कामात कुचराई करतील, त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, महापालिकेतील सर्वच प्रमुख विभागांनी आता वसुलीसाठी जोरदार मोहिमा सुरू केल्या असून मागील २७ दिवसांत पालिकेला विविध स्रोतांच्या माध्यमातून १४८.५६ कोटी मिळाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ४० कोटींची वसूली एलबीटी विभागाने केली आहे.
महापालिकेत एलबीटी लागू झाल्यापासून पालिकेच्या तिजोरीवर त्याचा परिणाम झाला होता. ठेकेदारांची चार ते पाच महिन्यांची बिले रखडली होती. प्रभागातील कामे रखडल्याने नगरसेवकदेखील आक्रमक झाले होते. परंतु, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वसूलीबाबत कडक धोरण राबवून एलबीटीसह मालमत्ताकर, पाणीपट्टी, शहर विकास विभाग आदींना कामाला लावून वसूलीसंदर्भात कडक निर्देश दिले. त्यानुसार, एलबीटी विभागाने ६५ जणांची टीम तयार करून प्रभाग स्तरावर कारवाई हाती घेऊन एका दिवसात सहा कोटींच्या वसूलीचा विक्रम केला.
तसेच मालमत्ताकर विभागाने थकबाकीदारांवरील व्याजात कपात केल्याने आता मालमत्ताधारकदेखील कर भरण्यास पुढे आले असून त्यांनी कर भरण्यास प्रभाग समिती कार्यालयात गर्दी केली आहे.
मालमत्ता कर विभागाने एका दिवसात ३ कोटी ५३ लाख, पाणीपट्टीपोटी ७३ लाखांची वसूली झाली आहे. (प्रतिनिधी)