स्वाइन फ्लूचा मुलांनाही विळखा
By Admin | Updated: February 13, 2015 04:56 IST2015-02-13T04:56:24+5:302015-02-13T04:56:24+5:30
गेल्या चार दिवसांत मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात १२ चिमुरड्यांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. राज्यासह मुंबईत स्वाईन फ्लू वाढत आहे. सं

स्वाइन फ्लूचा मुलांनाही विळखा
मुंबई : गेल्या चार दिवसांत मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात १२ चिमुरड्यांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. राज्यासह मुंबईत स्वाईन फ्लू वाढत आहे. संसर्गजन्य आजार असल्यामुळे यापासून वाचण्यासाठी काळजी घ्या, याचबरोबरीने लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे मुलांची काळजी विशेष काळजी घ्या, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.
स्वाईन फ्लूचा खोकल्यातून, शिंकण्यातून जास्त प्रमाणात संसर्ग होतो. यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. लहान मुले एकत्र खेळतात, वर्गात बाजूबाजूला बसतात, एकमेकांची वह्या, पुस्तके हाताळतात, खेळणी हाताळतात यामुळे एका मुलाला स्वाईनची लागण झाली असल्यास दुसऱ्या मुलांना त्याची लागण पटकन होऊ शकते. लहान मुलांना हवामान बदलामुळे सर्दी, खोकला, ताप असे आजार उद्भवतात. पण साधा फ्लू असल्यास दोन दिवसांत बरा होता. सर्दी, खोकलाही तीन ते चार दिवसांत बरा होतो. पण, मुलांमध्ये ही लक्षणे अधिक काळ आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी लागते कारण त्यांना संसर्ग कसा होतो, कोणत्या कारणांमुळे होतो याची माहिती नसते. यामुळे या मुलांना शाळेतून आणि घरातून याविषयीची माहिती देणे गरजेचे आहे. लहान मुलांचा स्वाईन फ्लूपासून बचाव करण्यासाठी काही साध्या गोष्टींचे पालन केले पाहिजे.
यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे त्यांना गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना कोणती साथ आल्यावर त्याची लस देणे अत्यंत गरजेचे असते. सध्या स्वाईन फ्लूची साथ आहे, तर फ्लूची लस लहान मुलांना द्या. ते तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक काळ आजारी असल्यास त्यांना बालरोगतज्ज्ञाकडे न्या, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. अमीन कितेकर यांनी सांगितले.
लहान मुलांना बाहेरून आल्यावर, खाण्याचा आधी आणि शक्य असल्यास दर दोन तासांनी स्वच्छ हात धुवायला सांगा. यामुळे संसर्ग होण्याचा धोका खूप कमी होईल. लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास होत असेल, मुले पेल दिसत असतील तर घरगुती उपचार करू नका, त्यांना डॉक्टरांकडे लगेच घेऊन जा, असे डॉ. कितेकर यांनी सांगितले.