पालिका अभियंत्यांचे प्रशासनाविरोधात बंड
By Admin | Updated: July 5, 2015 03:30 IST2015-07-05T03:30:27+5:302015-07-05T03:30:27+5:30
कर्मचाऱ्याला मारहाण करणारे उपायुक्त रणजित ढाकणे यांच्याविरोधात अभियंत्यांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे़ त्यामुळे २४ तासांमध्ये ढाकणे यांचे निलंबन न झाल्यास सोमवारी मध्यरात्रीपासून

पालिका अभियंत्यांचे प्रशासनाविरोधात बंड
मुंबई : कर्मचाऱ्याला मारहाण करणारे उपायुक्त रणजित ढाकणे यांच्याविरोधात अभियंत्यांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे़ त्यामुळे २४ तासांमध्ये ढाकणे यांचे निलंबन न झाल्यास सोमवारी मध्यरात्रीपासून पालिकेच्या सर्व अभियंत्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे़
बोरीवली येथील बन्सी नगर मशीदसमोर मातीचे ढिगारे पाहून उपायुक्त ढाकणे यांनी घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती़ तसेच साहाय्यक आयुक्तांचाही अवमान केला होता़ या घटनेमुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी तत्काळ काम बंद आंदोलन पुकारले होते़ या प्रकरणाची दखल घेऊन आयुक्त अजय मेहता यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपविली आहे़ मात्र अद्याप हा अहवाल सादर झालेला नाही़ यामुळे अभियंत्यांमध्ये रोष पसरला आहे़ त्यामुळे सोमवारपर्यंत ढाकणे यांच्या निलंबनाचा निर्णय न झाल्यास त्याच दिवशी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा अभियंता संयुक्त कृती समितीने दिला आहे़ (प्रतिनिधी)
अत्यावश्यक
सेवांवरही परिणाम
पालिकेचा कणा असलेले अभियंता वर्गच अनेक महत्त्वाच्या खात्याचे कामकाज चालवितात़ यामध्ये रस्ते, पाणी, इमारत प्रस्ताव अशा विभागांचा समावेश आहे़ या विभागांमधील अभियंत्यांनी संपात सहभाग घेतल्यास अत्यावश्यक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे़ मात्र याबाबत सोमवारीच निर्णय होणार आहे़
सोमवारपर्यंत ढाकणे यांच्या निलंबनाचा निर्णय न झाल्यास मध्यरात्रीपासून हा बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे.