पोलीस शिपायाचा असाही प्रताप
By Admin | Updated: April 27, 2015 04:47 IST2015-04-27T04:47:59+5:302015-04-27T04:47:59+5:30
मैत्रिणीसोबत दारूच्या नशेत जे. जे. उड्डाणपुलावरून भरधाव वेगात दुचाकी चालवणाऱ्या अंजुम पिंजारी या पोलीस शिपायाला जे.जे. मार्ग पोलिसांनी अटक केली. तो पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे.

पोलीस शिपायाचा असाही प्रताप
मुंबई : मैत्रिणीसोबत दारूच्या नशेत जे. जे. उड्डाणपुलावरून भरधाव वेगात दुचाकी चालवणाऱ्या अंजुम पिंजारी या पोलीस शिपायाला जे.जे. मार्ग पोलिसांनी अटक केली. तो पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे.
जे.जे. उड्डाणपुलावर दुचाकी चालवण्यास मनाई आहे. मात्र तरीदेखील अनेक दुचाकीस्वार वाहतूक पोलिसांची नजर चुकवून या उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने जातात. अशाच प्रकारे शनिवारी पहाटे पिंजारी हा त्याच्या मैत्रिणीसोबत या उड्डाणपुलावरून भरधाव वेगात जात होता. दारूच्या नशेत असल्याने त्याने गाडीचा वेग अधिकच वाढवला होता. त्यामुळे घाबरलेल्या मैत्रिणीने बचावासाठी आरडाओरडा केला.
या वेळी तेथे जे.जे. पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी गस्तीवर होते. हा प्रकार लक्षात त्यांच्या येताच, त्यांनी या तरुणीचा आवाज ऐकून दुचाकीचा पाठलाग केला. काही अंतर पुढे जाताच पोलिसांनी त्यांची दुचाकी अडवून दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तो पोलीस शिपाई असल्याचे उघड झाले.
मात्र जे.जे. मार्ग पोलिसांनी त्याला सोडून न देता त्याच्यावर भरधाव वेगात गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे जे.जे. पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)