वास्तववादी चित्रपटांना पसंती

By Admin | Updated: January 22, 2015 01:09 IST2015-01-22T01:09:06+5:302015-01-22T01:09:06+5:30

वास्तववादी चित्रपटांनी पाचव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा चौथा दिवस चांगलाच गाजला. ‘ख्वाडा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला.

Realistic Films Preferred | वास्तववादी चित्रपटांना पसंती

वास्तववादी चित्रपटांना पसंती

मुंबई : वास्तववादी चित्रपटांनी पाचव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा चौथा दिवस चांगलाच गाजला. ‘ख्वाडा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. त्याचबरोबर माजी स्विडीश पंतप्रधान यांच्या जीवनावर बेतलेला रशियन चित्रपट ‘पाल्मा’ आणि इजिप्तचा ‘थिफ अँड डॉग्स’ तसेच ‘मुन्नारीयीप्पू’ या तामिळ चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
विशेष लक्षणीय बाब म्हणजे ‘ख्वाडा’च्या टीमने लावलेली हजेरी. दिग्दर्शक आणि निर्माता भाऊराव कऱ्हाडे, सहनिर्माता चंद्रकांत राऊत, मुख्य कलाकार भाऊसाहेब शिंदे, सह दिग्दर्शक वैशाली केंदळे आणि अभिनेत्री रसिका चव्हाण यांची चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे संयोजक दत्ता बाळसराफ यांनी या चमूचे स्वागत करत कौतुकही केले.
शेळ्या-मेंढ्या पाळणे हा धनगर समाजाचा आजही मुख्य व्यवसाय आहे. गावोगावी फिरत आपल्या शेळ्या-मेंढ्या ते जगवत असतात. अशाच एका कुटुंबाचा ‘ख्वाडा’ (शेळ्या-मेंढ्यांचा फिरता कळप) एका गावात पोहोचतो. तिथे त्यांच्या जीवनात कोणकोणत्या समस्या ‘खोडा’ म्हणजे अडथळे निर्माण होतात, याची कथा चित्रपटात साकारली आहे. ख्वाडातील कुटुंब प्रातिनिधिक स्वरूप म्हणून मानले तर राज्यातील अशाच भटकंती करत जगणाऱ्या लोकांची स्थिती आपल्या नजरेसमोर उभी राहते. एका विशिष्ट समाजाची परिस्थिती दाखवण्यासाठी हा चित्रपट केलेला नसून एका कुटुंबाची ती कहाणी असल्याचे दिग्दर्शक कऱ्हाडे यांनी सांगितले.
तसेच मंगळवारी या महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे शॉर्टफिल्म्सचे स्क्रीनिंग झाले. राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी या शॉर्टफिल्म बनवल्या गेल्या आहेत. या फिल्मही प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Realistic Films Preferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.