वाचनालयास धोरणांचा फटका

By Admin | Updated: July 31, 2015 00:08 IST2015-07-31T00:08:35+5:302015-07-31T00:08:35+5:30

शहरात वाचन चळवळ वाढविण्यासाठी साहित्यप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन सीवूडमध्ये कवी कुसुमाग्रज वाचनालय सुरू केले. चार वर्षांत ५ हजारपेक्षा जास्त ग्रंथ संकलित केले आहेत.

Reading policy | वाचनालयास धोरणांचा फटका

वाचनालयास धोरणांचा फटका

-  नामदेव मोरे,  नवी मुंबई
शहरात वाचन चळवळ वाढविण्यासाठी साहित्यप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन सीवूडमध्ये कवी कुसुमाग्रज वाचनालय सुरू केले. चार वर्षांत ५ हजारपेक्षा जास्त ग्रंथ संकलित केले आहेत. बालसंस्कार वर्गापासून व्याख्यानांपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु सरकारने चार वर्षांपासून नवीन ग्रंथालयांना मंजुरी देणे बंद केल्याचा फटका या संस्थेलाही बसला असून लोकाश्रयावर वाचन चळवळ चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सीवूडमधील नागरिकांसाठी एकही ग्रंथालय उपलब्ध नसल्यामुळे साहित्यप्रेमी नागरिकांनी २००८ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर दिवाळी अंक योजना सुरू केली. यानंतर ललित पाठक व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी वाशीतील प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालयाची शाखा फेब्रुवारी २००९ मध्ये सुरू केली. परंतु ग्रंथालयाच्या शाखेचा विस्तार करण्यास भविष्यात अडचणी येतात यामुळे २०११ मध्ये कवी कुसुमाग्रज ग्रंथालय सुरू करण्यात आले. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली. परंतु याच दरम्यान शासनाने नवीन ग्रंथालयांना मान्यता देणे बंद केले. गत चार वर्षांत ही बंदी कायम आहे. कोणतेही शासकीय अनुदान मिळत नसताना वाचनालयाने लोकाश्रयावर ग्रंथालयाचा कारभार चांगल्या प्रकारे सुरू ठेवला आहे. ग्रंथालयामध्ये विविध प्रकारची ५ हजारपेक्षा जास्त ग्रंथ उपलब्ध आहेत. ३० आश्रयदाते, १६० अजीव सभासद व ४१५ वर्गणीदार सभासद आहेत. लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी मोठ्याप्रमाणात पुस्तके घेण्यात आली आहेत. मुलांसाठी विविध प्रकारची १ हजार पुस्तके उपलब्ध आहेत. ग्रंथालयामध्ये बालवाचकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.
वर्तमानपत्र, मासिके, कथा,कादंबरी व इतर सर्व प्रकारचे ग्रंथ उपलब्ध होणारे कवी कुसुमाग्रज ग्रंथालय ही सीवूडमधील एकमेव संस्था आहे. वाचन चळवळ वाढविण्याचे काम करत असतानाच वर्षभर विविध विषयांवर व्याख्याने,गड, किल्ल्यांना भेटी, संस्कार वर्ग, ग्राहक संघ असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. सीवूडची सांस्कृतिक ओळख असे स्वरूप या संस्थेला प्राप्त झाले आहे. ग्रंथालयास राज्य शासनाच्या ग्रंथालय विभागाची मान्यता मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु नवीन वाचनालयांना मान्यता देणेच थांबविण्यात आले आहे. याचा मोठा फटका या संस्थेस मिळत आहे. ग्रंथालयाचा कारभार चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दानशूर व्यक्तींच्या मदतीवर आतापर्यंत कामकाज सुरू आहे. परंतु भविष्यात लवकरात लवकर मान्यता मिळाली नाही तर ग्रंथालयाच्या विस्तारास मर्यादा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रवीण पाटील, सर्जेराव कुईगडेहे, ललित पाठक, जयवंत पाटील, प्रज्ञा लळीगकर, पल्लवी देशपांडे व इतर अनेक जण वाचन चळवळ वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

राबविलेले उपक्रम
-मुलांसाठी नियमित बालसंस्कार वर्ग
-प्रत्येक वर्षी ऐतिहासिक ठिकाणी सहल
-नागरिकांना स्वस्त दरात अत्यावश्यक वस्तू पुरविणारा ग्राहक संघ
-नामवंत कवी गुरू ठाकूर यांचा कार्यक्रम
-श्रीधर फडके यांचे गीतरामायण
-डॉ. प. वी. वर्तक यांचे व्याख्यान
-कवी अशोक नायगावकर यांचे काव्य वाचन
-चित्रपट कलाकार शरद पोंक्षे यांचे सावरकर विषयावर व्याख्यान
-शिवजयंतीनिमित्त जयवंत पाटील यांचे व्याख्यान

सीवूड परिसरात वाचन चळवळ वाढविण्यासाठी कवी कुसुमाग्रज ग्रंथालय सुरू केले आहे. परंतु चार वर्षांत शासनाकडून मान्यता मिळत नाही. लोकाश्रयावर संस्थेचा कारभार सुरू आहे. पाच हजारपेक्षा जास्त पुस्तके ग्रंथालयात आहेत. वर्षभर व्याख्याने,बालसंस्कार वर्गाचे आयोजन केले जात आहे. सर्व उपक्रम राबविताना तारेवरची कसरत करावी लागत असून शासनाने शक्य तितक्या लवकर वाचनालयास मान्यता द्यावी अशी सर्व साहित्यप्रेमींची मागणी आहे.
- ललित पाठक, सचिव,
कवी कुसुमाग्रज वाचनालय

Web Title: Reading policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.