बड्या नेत्यांची प्रचाराकडे पाठ

By Admin | Updated: April 15, 2015 00:21 IST2015-04-15T00:21:42+5:302015-04-15T00:21:42+5:30

काँगे्रस पक्षश्रेष्ठींनी नवी मुंबई काँगे्रसला नेहमीच वाऱ्यावर सोडले आहे. यंदाच्या निवडणुकीत ही उणीव पक्षफुटीमुळे प्रकर्षाने जाणवत आहे.

Read the publicity of the big leaders | बड्या नेत्यांची प्रचाराकडे पाठ

बड्या नेत्यांची प्रचाराकडे पाठ

नारायण जाधव ल्ल नवी मुंबई
काँगे्रस पक्षश्रेष्ठींनी नवी मुंबई काँगे्रसला नेहमीच वाऱ्यावर सोडले आहे. यंदाच्या निवडणुकीत ही उणीव पक्षफुटीमुळे प्रकर्षाने जाणवत आहे. महापालिका निवडणूक प्रचाराचा अंतिम टप्पा आला तरी अद्याप एकही मोठा नेता शहरात फिरकलेला नाही. यामुळे येथील काँगे्रसजनांना आता फक्त १८ एप्रिल रोजी होणाऱ्या प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभेचा आधार राहिला आहे.
एकेकाळी नवी मुंबईचा पट्टा हा काँगे्रसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. शांताराम घोलप, जनार्दन गौरी यांनी या भागाचे लोकसभा, विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून येथील काँगे्रसला श्रेष्ठींनी पोरके केले आहे. मात्र अशाही परिस्थितीत गेल्या २० वर्षांत स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वबळावर १५ ते २० नगरसेवक निवडून आणले आहेत. मावळत्या सभागृहात काँगे्रसचे १३ नगरसेवक होते. त्यापैकी नामदेव भगत, इंदुमती भगत, रंगनाथ औटी, रामा वाघमारे, सिंधू नाईक या नगरसेवकांनी काँगे्रसचा ‘हात’ सोडला आहे. तर अंकुश सोनवणे, प्रकाश माटे यांनी पुन्हा घरवापसी केली आहे.
यंदाच्या निवडणुकीची जबाबदारी ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यावर सोपविण्यात आली होती. काहीशा नाखुशीत त्यांनी ती स्वीकारली होती. मात्र वांद्रे येथील पोटनिवडणुकीत ते उतरल्याने प्रदेश काँगे्रसचे नवे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माजी मंत्री रमेश बागवे यांना नवी मुंबईच्या मोहिमेवर धाडले. सोबत मुश्ताक अंतुलेंना दिले. मात्र आधीच पक्षश्रेष्ठींच्या पाठिंब्याअभावी गेल्या २० वर्षांपासून अर्धपोटी लढाई लढणाऱ्या स्थानिक काँगे्रस कार्यकर्त्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आपल्यावर पक्षाने दिल्याचा साक्षात्कार बागवे यांना येथे आल्यावर झाला. मात्र नाचक्की नको म्हणून त्यांनी दिलेली जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या पक्षात दशरथ भगत, रमाकांत म्हात्रे, संतोष शेट्टी, अनिल कौशिक आणि अविनाश लाड हे स्थानिक नेते आपापल्या परीने लढत आहेत. परंतु उर्वरित लहानसहान कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपाच्या सधन कार्यकर्त्यांपुढे पुरती आर्थिक कोंडी झाल्याचे दिसत आहे.

च्गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक काँगे्रस कार्यकर्त्यांनी सिडकोसह महापालिकेवर अनेकदा मोर्चा काढून आंदोलने केली आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात लढाई दिली आहे. मग रस्त्यावरची असो वा न्यायालयीन. प्रत्येक बाबतीत स्थानिक काँगे्रस कार्यकर्ते शिवसेनेविरोधात नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. गेल्या पाच वर्षांत तर काँगे्रसजनांनी आंदोलनात सर्वच पक्षांवर कडी केली आहे. मात्र शिवसेना श्रेष्ठींनी जसे पाठबळ शिवसैनिकांना दिले, तसे पाठबळ काँगे्रसश्रेष्ठींनी कधीच दिले नाही. प्रकल्पग्रस्तांच्या घरासह सिडको क्षेत्रातील सर्वसामान्यांनी घरे, धोकादायक इमारतींचा प्रश्न, क्लस्टर, स्विपिंग मशिन घोटाळा, हॉस्पिटल्समधील गैरसोयी अशी अनेक आंदोलने स्थानिक काँगे्रस कार्यकर्त्यांनी स्वबळावर केली आहेत.

शिलेदारांना रिकाम्या बंदुका
या महापालिका निवडणुकीत समोर उभ्या असलेल्या राजकीय वाघाची शिकार करायला पाठविलेल्या आपल्या ९२ शिलेदारांना काँगे्रस पक्षाने निवडणुकीसाठी रिकाम्या बंदुका घेऊन पाठविले आहे. गोळ्या सोडाच परंतु साधे छर्रेही त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे ही लढाई कशी लढायची, असा प्रश्न या मैदानात उतरलेल्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

गेली १५ वर्षे राज्याच्या सत्तेवर असलेल्या काँगे्रसच्या पक्ष पदाधिकारी आणि मंत्रिमंडळातील एकाही बाबा, दादा, महसूल सांभाळणारे साहेब किंवा आयुष्यभर सहकाराचे राजकारण करणाऱ्या ‘राधा’कृष्णांनी आर्थिक मदतीचा हात सोडाच परंतु निवडणूक प्रचारात उतरून पाठीवर हात ठेवून तू फक्त लढ, असे म्हटलेले नाही. विधिमंडळ अधिवेशनावर काँगे्रसचे श्रेष्ठी निवडणूक प्रचारात उतरतील, अशी अपेक्षा होती. परंतु अद्याप एकही नेता न फिरकल्याने ती फोल ठरली आहे.

 

Web Title: Read the publicity of the big leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.