रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये केली पाव टक्क्याची कपात

By Admin | Updated: June 2, 2015 13:08 IST2015-06-02T11:41:32+5:302015-06-02T13:08:06+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी पतधोरण जाहीर करत रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात केल्याने तो ७.२५ टक्के इतका झाला आहे.

RBI cuts repo rate by 25 basis points | रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये केली पाव टक्क्याची कपात

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये केली पाव टक्क्याची कपात

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २ - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी पतधोरण आढावा जाहीर करत रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात केल्याने तो ७.२५ टक्के इतका झाला आहे. रिझर्व्ह बँकेने सलग तिस-यांदा रेपो रेटमध्ये बदल केला असून या निर्णयामुळे होम अथवा कार लोन आणखी स्वस्त होण्याची शक्यता असून ग्राहकांना दिलासा मिळू शकेल. दरम्यान रिव्हर्स रेपो रेट ६.२५ टक्के इतका झाला असून सीआरआर ( कॅश रिझर्व्ह रेशो) ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.  
महागाईचा दर कमी झाल्याने व औद्योगिक उत्पादन वाढल्याने रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे, असे आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केले. तसेच बँकांनीही रेपो रेट कमी झाल्याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोचवण्यास सुरूवात केल्याचेही ते म्हणाले. 
 
रेपो रेट म्हणजे काय?
रिझर्व्ह बँक इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते त्याचा व्याजदर म्हणजे रेपो रेट. तो व्याज दर कमी झाल्याने इतर बँकाही आपल्या व्याज दरात कपात करतील आणि त्याचा फायदा बँकेकडून कर्ज घेणा-या ग्राहकांना मिळेल.
 
शेअर बाजार कोसळला
रिझर्व्ह बँकेने रेपो रेट (व्याज दर) अपेक्षेपेक्षा कमी कपात केल्याने व सीआरआर कायम ठेवल्याने शेअर बाजार कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स ३७८ अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांक ११६ अंकांनी खाली कोसळला. 
रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होण्यापूर्वी सेन्सेक्समध्ये १८० अंकाची घसरण होऊन तो २७६६८.७० वर तर निफ्टी ५९ अंकांनी घसरून ८३७४.३५ वर पोचला होता. मात्र व्याज दरात अपेक्षेपेक्षा कमी कपात झाल्याने व सीआरआर कायम राहिल्याने निराश झालेल्या गुतंवणूकदारांनी शेअर्सच्या विक्रीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्स ३७७.05 अंकांनी खाली कोसळून २७४७१.१४ आणि निफ्टी ११५.८० अंकांनी खाली कोसळून ८३१७.६० वर पोचला. 
 
 
 

Web Title: RBI cuts repo rate by 25 basis points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.