Join us

"अमोलची माफी मागितली, पण ४८ मतांनी जिंकलो ही..."; निसटत्या विजयानंतर वायकरांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 22:32 IST

Ravindra Waikar : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mumbai North West Lok Sabha Election Result :मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा अतिशय धक्कादायक निकाल लागला आहे. ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा शिवसेना शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी केवळ ४८ मतांनी पराभव केला. फेरमतमोजणीत वायकर यांनी अमोल कीर्तिकर यांच्यावर विजय मिळवला. त्यामुळे अमोल कीर्तिकर यांचा निसटता पराभव झाला. पुन्हा मतमोजणी झाल्यानंतर अखेर ४८ मतांनी रवींद्र वायकर यांचा विजय घोषित करण्यात आले. या निकालानंतर रवींद्र वायकर यांनी माझे कामच माझा ब्रँड आहे असे म्हणत केवळ ४८ मतांनी जिंकलोय ही सोपी गोष्ट नाही, असे म्हटलं आहे.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या २६ फेऱ्या झाल्या. टपाल मतांची मोजणी झाल्यानंतर अमोल किर्तीकर यांना ४ लाख ५२ हजार ५९६ मते मिळाली होती. तर रवींद्र वायकर यांना ४ लाख ५२ हजार ६४४ मते मिळाली. मात्र अमोल किर्तीकर यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली, ज्यामध्ये अमोल किर्तीकर एका मताने पुढे असल्याचे सांगण्यात आले होे. मात्र पुन्हा मतमोजणी झाल्यानंतर अखेर ४८ मतांनी रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आले.

या निकालानंतर रवींद्र वायकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. "कार्यकर्त्यांचे उपकार मी विसरू शकणार नाही. माझ्याकडून चांगले काम होणार असेल तरच मला विजयी कर अशी देवाकडे प्रार्थना केली होती.अमोलची माफी मागितली, माझे त्याच्याशी वैमनस्य नाही. माझे कामच माझा ब्रँड आहे. वाजपेयी सरकार एका मताने हरले होते. मी १३ दिवस प्रचार केला आणि ४८ मतांनी जिंकलोय ही सोपी गोष्ट नाही,"  अशी प्रतिक्रिया रवींद्र वायकर यांनी दिली.

अमोल किर्तीकरच्या निवडणूक निकालाला आव्हान देणार - उद्धव ठाकरे

अमोल किर्तीकरांच्या निसटत्या पराभवानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. वायव्य मुंबईत अमोल किर्तीकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबईलोकसभा निवडणूक २०२४ निकालअमोल कीर्तिकररवींद्र वायकर