रस्ताव्यापी इलेक्ट्रीक टॉवर्सचा आकार कमी?
By Admin | Updated: December 14, 2014 23:23 IST2014-12-14T23:23:34+5:302014-12-14T23:23:34+5:30
शहरात असलेल्या इलेक्ट्रीसिटी ट्रान्समिशन लाइन्सचे महाकाय टॉवर्स रस्त्यांवर बांधल्याने त्यांच्या पसाऱ्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता अपुरा आहे.

रस्ताव्यापी इलेक्ट्रीक टॉवर्सचा आकार कमी?
राजू काळे, भार्इंदर
शहरात असलेल्या इलेक्ट्रीसिटी ट्रान्समिशन लाइन्सचे महाकाय टॉवर्स रस्त्यांवर बांधल्याने त्यांच्या पसाऱ्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता अपुरा आहे. मात्र, आता या भल्यामोठ्या टॉवर्सची व्याप्ती लवकरच ६० ते ७० टक्क्यांनी कमी होणार आहे.
शहरातील लोकवस्ती दिवसागणिक वाढत असून त्याच प्रमाणात वाहनेही वाढत आहेत. शहराच्या तिन्ही बाजूंस खाडी व समुद्र असल्याने शहरातील बहुतांशी भाग सीआरझेड (कोस्टल रेग्युलेटरी झोन) बाधित असल्याने शहरांतर्गत नवीन रस्ते निर्माणाचा मार्ग तूर्तास बंद झाला आहे. काही नवीन रस्त्यांचा प्रस्ताव राज्याच्या पर्यावरण विभागाकडे धूळखात पडला आहे. त्यामुळे आहे त्या रस्त्यांवरीलच वाहतुकीचे नियोजन सध्या सुरू आहे. त्यातच काही महत्त्वाच्या वाहतूक रस्त्यांवर इलेक्ट्रीसिटी ट्रान्समिशन लाइन्सचे महाकाय इलेक्ट्रीक टॉवर्स बांधल्याने रस्ता मोठ्या प्रमाणात व्यापला गेला आहे. त्यात भार्इंदर पश्चिमेकडील १५० फूट, पूर्वेकडील गोल्डन नेस्ट, मीरा रोड येथील हाटकेश, सिल्व्हर पार्क आदी शहरांतर्गत मुख्य रस्त्यांचा समावेश आहे. या टॉवर्समुळे वाहतुकीसाठी अपुरा रस्ता उपलब्ध असताना काही ठिकाणी तर रस्त्यांच्या दुतर्फा मोठे नाले असल्याने रस्ता आणखी कमी झाला आहे. या अपुऱ्या रस्त्यांमुळे सुरक्षित वाहतुकीत अडचण निर्माण होत आहे. शिवाय, रस्त्यांवरच हे टॉवर्स बांधण्यात आल्यामुळे अनेक वेळा समोरून येणारी वाहने दिसून येत नसल्याने अपघाताची शक्यता बळावत आहे. या महाकाय इलेक्ट्रीक टॉवर्सचा आकार कमी व्हावा, यासाठी पालिकेने टॉवर्सची मालकी असलेल्या रिलायन्स एनर्जी या वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीकडे गेल्या दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा सुरू केला होता. त्याला यश आल्याने येत्या दोन महिन्यांत त्याचे काम सुरू होणार आहे. याबाबत, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले की, आॅगस्ट २०११ पासून रिलायन्स एनर्जीकडे टॉवर्स स्थलांतरासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यावर झालेल्या चर्चेत रिलायन्स एनर्जीमार्फत एका सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून हे टॉवर्स स्थलांतर करण्याऐवजी ते ६० ते ७० टककयांनी कमी करण्यावर शिक्कामोर्तब आले आहे. हे काम लवकरच सुरू होणार असल्याने वाहतुकीसाठी जास्तीतजास्त रस्ता उपलब्ध होणार आहे.