राणेपुत्राने काँग्रेसवर फोडले खापर!
By Admin | Updated: April 17, 2015 01:28 IST2015-04-17T01:28:16+5:302015-04-17T01:28:16+5:30
वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील नारायण राणे यांच्या पराभवाचे खापर त्यांचे पुत्र आ. नितेश राणे यांनी काँग्रेस संघटनेवर फोडले.

राणेपुत्राने काँग्रेसवर फोडले खापर!
मुंबई : वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील नारायण राणे यांच्या पराभवाचे खापर त्यांचे पुत्र आ. नितेश राणे यांनी काँग्रेस संघटनेवर फोडले. पक्षाकडे संघटनात्मक ताकत नसल्याने त्याचा फटका बसला, असा थेट आरोप त्यांनी केला. तर मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी नितेशचा आरोप साफ फेटाळून लावला आहे.
वांद्रेतील पराभवास मी स्वत: जबाबदार असून काँग्रेस पक्षातील सर्व नेत्यांनी मनापासून मेहनत घेतली, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी काल व्यक्त केली होती. मात्र त्यांचे सुपुत्र नितेश यांनी आज वेगळाच राग आळवला. ‘लोकमत’शी बोलताना नितेश म्हणाले, शिवसेनेचा उमेदवार कमकुवत होता; पण संघटना मजबूत होती. त्याउलट आमचा उमेदवार तगडा होता, पण संघटना शून्य
होती. काँग्रेसकडे टेबल लावणारे, बुथवर बसणाऱ्या कार्यकर्त्यांची फळीच नाही. काँग्रेसमध्ये नेते तयार झाले; पण कार्यकर्तेच तयार झाले नाहीत, अशी टीकाही त्यांनी स्वपक्षावर केली.
आ. राणे यांनी केलेले आरोप साफ फेटाळून लावत निरुपम म्हणाले, निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. नारायण राणे यांना विचारूनच वार्डनिहाय नियोजन केले. यशाचे बाप अनेक असतात, मात्र अपयशाचे श्रेय कोणीच घेत नाही. अंधारात कोण काय करत होते, या वादात आपल्याला पडायचे नाही; पण अनावश्यक टीकेने कार्यकर्ते नाऊमेद होतात हे लक्षात घेतले पाहिजे. सगळ्या गोष्टी हायकमांडपुढे मांडणार, असा सूचक इशाराही निरुपम यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
प्रदेशाध्यक्षांचे नो कॉमेन्ट!
च्आ. नितेश राणे यांनी पक्षसंघटनेवर केलेल्या टीकेसंदर्भात विचारले असता
च्प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘नो कॉमेंट्स’ एवढेच, पण समर्पक उत्तर दिले.
गाडगीळ म्हणाले,
काँग्रेस कशी समजणार?
काँग्रेसचे प्रवक्ते आ. अनंत गाडगीळ यांनी या विषयाला खास पुणेरी भाषेत उत्तर दिले. ते म्हणाले, जन्मापासून मी काँग्रेसमध्ये आहे, पण मला अजून काँग्रेस समजलेली नाही. तिथे कालपरवा पक्षात आलेल्या मंडळींना कशी समजणार?