रत्नागिरी बसस्थानक बनणार हायटेक!
By Admin | Updated: September 7, 2014 23:55 IST2014-09-07T23:39:58+5:302014-09-07T23:55:37+5:30
पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते भूमिपूजन : दोन वर्षात प्रवाशांच्या सेवेत होणार रुजू

रत्नागिरी बसस्थानक बनणार हायटेक!
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. राज्यातील चार बसस्थानके हायटेक होणार असून, त्यामध्ये रत्नागिरी बसस्थानकाचाही समावेश आहे. सुसज्ज, अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त असलेले मध्यवर्ती बसस्थानक येत्या दोन वर्षात प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ आज (रविवारी) पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते करण्यात आला.
रत्नागिरी बसस्थानक आता लवकरच एका नव्या हायटेक रुपात दिसणार आहे. या कामाचे भूमिपूजन रविवारी पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले. विभाग नियंत्रक के.बी. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. गेली ६६ वर्षे हे महामंडळ प्रवाशांच्या सेवेत असून, दररोज सव्वा लाख विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. प्रवाशांसाठी २७ प्रकारच्या सवलती देण्यात येत असल्याचे सांगितले. रत्नागिरीचे बसस्थानक तीन मजली उभारण्यात येणार असून, लिफ्ट असलेले राज्यातील पहिले बसस्थानक असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे विभागीय सचिव शेखर सावंत यांनी पालकमंत्री कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे औचित्य साधून मान्यवरांचे हस्ते बस वाहतूक वेळापत्रक व रिक्षाचे टेरीफकार्डाचे प्रकाशन करण्यात आले. महामंडळास सुसज्ज असे बसस्थानकाचे बांधकाम विकासकाच्या खर्चाने विनामूल्य बांधून मिळणार आहे. बसस्थानकाची स्वच्छता पुढील ३० वर्षे विनामूल्य मिळणार आहे. त्यामुळे स्वच्छतेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. पुढील तीस वर्षांच्या कालावधीत भाड्याच्या स्वरूपात एस. टी. महामंडळाला उत्पन्न मिळणार आहे. बसस्थानक व व्यापारी संकुलाचा भूखंड यावर विकसित झालेले बांधकाम याची मालकी कायमस्वरूपी महामंडळाची राहणार आहे.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजलक्ष्मी सुर्वे यांनी केले. प्रकल्प विकासक नंदकुमार शहा यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
तीन मजली बसस्थानक
बसस्थानकामध्ये शहरी मार्गावरील १० फलाट तळमजल्यावर व लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण गाड्यांसाठी १४ फलाट पहिल्या मजल्यावर बांधण्यात येणार आहेत. ३८ हजार चौरस फुटाचे व्यापारी संकुल दुसऱ्या मजल्यावर उभारण्यात येणार आहे. बसस्थानकामध्ये चालक - वाहक विश्रांतीगृह, स्थानकप्रमुख कक्ष, आगार व्यवस्थापक कक्ष, अधिकारी अतिथीगृह उभारण्यात येणार आहे. या बसस्थानकात तळमजल्यासह एकूण तीन मजले असतील. बसस्थानकाचा दर्शनी भाग आकर्षक बनवण्यात येणार आहे. बागबगीचा, हिरवळीने सुशोभित करण्यात येणार आहे. बसस्थानक आवारात सर्व बाजूनी वृक्षारोपण तसेच काँक्रिट पेवमेंट, प्रशस्त वाहनतळ उभारण्यात येणार आहे.
व्यापारी संकुलाचाही समावेश
संकुलामध्ये तळमजल्यावर ५० हजार लीटर पिण्याच्या पाण्याची टाकी व पहिल्या मजल्यावर २५ हजार लीटर पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. बसस्थानकामध्ये फळांचे स्टॉल्स, मनोरंजन हॉल, कृषी साहित्य विक्री केंद्र व तत्सम व्यावसायिकांसाठी गाळे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. अत्याधुनिक सेवा असलेला बसस्थानकाचा प्रकल्प १७ कोटीचा असल्याचे विभाग नियंत्रक देशमुख यांनी सांगितले.
पन्नास बसेस लवकरच ताफ्यात
रत्नागिरी एस. टी. विभागाला शंभर बसेस उपलब्ध करून देणार असून, ५० गाड्या महिनाभरात, तर उर्वरित ५० गाड्या दोन महिन्यात उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.
लिफ्ट असलेले पहिले बसस्थानक
कर्मचारी व प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा असणारे रत्नागिरी हे राज्यातील पहिले बसस्थानक असणार आहे.
२७ प्रकारच्या सवलती एस. टी. महामंडळाकडून प्रवाशांना दिल्या जात असल्याची देशमुख यांची माहिती.
बसस्थानक स्वच्छतेचा प्रश्न पुढील ३0 वर्षे निकालात निघाल्याने समाधान.