रतीसुखाचा आवेग बेतला प्रेयसीच्या जिवावर, मृत्यूचे गूढ वर्षभराने उकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 02:20 IST2018-07-03T02:17:32+5:302018-07-03T02:20:18+5:30
रतीसुखाच्या आवेगात प्रेयसीच्या गळ्यावर हात ठेवला आणि त्यातच श्वास कोंडल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती इस्रायली पर्यटक महिलेच्या मृत्यू प्रकरणातून उघड झाली आहे.

रतीसुखाचा आवेग बेतला प्रेयसीच्या जिवावर, मृत्यूचे गूढ वर्षभराने उकलले
- मनीषा म्हात्रे
मुंबई : रतीसुखाच्या आवेगात प्रेयसीच्या गळ्यावर हात ठेवला आणि त्यातच श्वास कोंडल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती इस्रायली पर्यटक महिलेच्या मृत्यू प्रकरणातून उघड झाली आहे. फॉरेन्सिक अहवालातून वर्षभराने ही बाब उघडकीस येताच, इस्रायलमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रियकर ओरीरॉन याकोव्ह (२३) विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
मूळचा इस्रायलचा रहिवासी असलेला ओरीरॉन याकोव्ह (२३) हा त्याच्या २० वर्षीय प्रेयसीसोबत गेल्या वर्षी मार्च महिन्यात मुंबईत आला होता. कुलाबा येथील एका नामांकित हॉटेलमध्ये ते थांबले होते. २३ मार्च रोजी अचानक प्रेयसी हालचाल करत नसल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. कुलाबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रेयसीला रुग्णालयात नेले. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. परदेशी पर्यटक महिलेच्या मृत्यूमुळे पोलिसांची तारांबळ उडाली. कुठल्याही संशयास्पद खुणा नसल्याने तिच्या मृत्यूचे गूढ निर्माण झाले होते. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला.
अखेर वर्षभराने शवविच्छेदनाचा अहवाल कुलाबा पोलिसांना मिळाला. तपासात समोर आलेल्या माहितीची योग्य शहानिशा करून, समोर आलेल्या सत्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
१४ मार्च रोजी दुपारी एक ते पावणे दोनच्या दरम्यान प्रेयसीसोबत संभोग सुरू असताना, याकोव्हचा ताबा सुटला. तिचा नकार असतानाही, संभोगाच्या आवेगात त्याने हात तिच्या गळ्यावर ठेवला. अशात तिच्या गळ्यावर हाताने दाब दिल्यामुळे तिचा श्वास कोंडला आणि तिचा मृत्यू झाला.
भानावर आल्यानंतर त्याला प्रेयसी बेशुद्धावस्थेत दिसली. सुरुवातीला ती झोपली असल्याचा अंदाज त्याने बांधला. मात्र, बराच वेळ तिला हलवूनदेखील काहीच प्रतिसाद येत नसल्याने तो घाबरला. त्याने पोलिसांची मदत घेतली. सुरुवातीला याबाबत त्याने पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, फॉरेन्सिक अहवालानंतर त्याला पोलिसांनी उलटसुलट प्रश्न करताच, वरील घटनाक्रम उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
फोरेन्सिक, तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर गुन्हा दाखल
फॉरेन्सिक अहवाल आणि त्यावर तज्ज्ञांकडून घेतलेल्या सल्ल्यानंतर इस्रायलच्या प्रियकराविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी, ३० जून रोजी गुन्हा दाखल केल्याची माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर यांनी दिली.