Rat Bite in Car and Insurance Ombudsman: तुमची नवीकोरी कार स्टार्टर देऊनही सुरु होत नसेल.. सर्व्हिस सेंटरमध्ये गेल्यावर कळलं की उंदराने वायर कुरतडलीये आणि दुरुस्तीचा खर्च २.५० लाख आहे.. त्यातही "उंदराने फक्त वायरच कुरतडलीये; बाकीचं नुकसान आम्ही देणार नाही, केवळ वायरचे २५० रुपये देऊ" असं विमा कंपनीने तुम्हाला सांगितलं तर... तुमच्याही पोटात गोळा येईल ना? पण अजिबात काळजी करू नका. विमा कंपनीकडून काही वेळा उडवाउडवीची उत्तरंं किंवा तांत्रिक कारणं पुढे केली जातात. पण ग्राहक म्हणून आपल्याला आपले हक्क माहिती हवेत आणि न्यायही मिळायलाच हवा. मुंबई उपनगरांत राहणारे डॉ. विजय श्रीराम आठल्ये यांच्याबाबतीत असाच एक किस्सा घडला. त्यांचा अनुभव खरोखरच प्रेरणादायी आणि डोळे उघडणारा आहे. एका उंदरामुळे कारचे झालेले अडीच लाखांचे नुकसान आणि त्यानंतर विमा कंपनीशी दिलेला कायदेशीर लढा, हा प्रवास अनेकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो.
डॉ. आठल्ये यांनी आपला संपूर्ण अनुभव सोशल मीडियावर सांगितला. त्या पोस्टचा सारांश...
काहीवेळा छोट्या वाटणाऱ्या घटना मोठ्या संकटांना निमंत्रण देतात. नामांकित डॉक्टर विजय श्रीराम आठल्ये यांच्या Mahindra XUV 700 या हाय-टेक कारबाबत घडलेला प्रकार वाहन मालकांसाठी धोक्याची घंटा असून, विमा हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देणारा आहे.
धक्कादायक घटना आणि तांत्रिक बिघाड:२७ जून २०२४ ला कार सुरू होत नसल्याने कार वर्कशॉपमध्ये नेण्यात आली. तपासात धक्कादायक वास्तव समोर आले. उंदराने सनरुफचा 'ड्रेनेज होज पाईप' कुरतडला होता. परिणामी, पावसाचे पाणी बाहेर न जाता थेट गाडीच्या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक कार्ड आणि वायरिंग हार्नेसमध्ये साचले. यामुळे गाडीची संपूर्ण इलेक्ट्रॉनिक सिस्टीम कोलमडली. वर्कशॉपने दुरुस्तीचा खर्च तब्बल २.५० लाख रुपये सांगितला गेला.
विमा कंपनीचा आडमुठेपणा:गाडी 'झिरो डेपो' आणि 'बंपर-टू-बंपर' विम्याने संरक्षित असतानाही, Digit Insurance ने क्लेम फेटाळला. "केवळ पाईप बदलून देऊ, पाण्याचे नुकसान (Consequential damage) कव्हर नाही," असा अजब युक्तिवाद कंपनीने केला. तीन वेळा क्लेम फेटाळल्यानंतर, डॉ. आठल्ये यांनी स्वतःच्या खिशातून पैसे भरून कार तात्पुरती दुरुस्त केली, पण अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले.
विमा लोकपाल (Insurance Ombudsman) – न्यायाचा मार्ग:कंझ्युमर कोर्टातील वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी डॉ. आठल्ये यांनी सरकारच्या 'बीमा लोकपाल'कडे ऑनलाइन दाद मागितली. यासाठी कुठेही जावे लागत नाही. घरच्याघरी ऑनलाईन सुनावणी होते आणि न्यायनिवाडा केला जातो. सुनावणी दरम्यान समोर आले की, विमा कंपनीने पाठवलेला सर्वेअर तांत्रिकदृष्ट्या अपात्र होता. न्यायाधीश महोदयांनी स्पष्ट केले की, नुकसानाचे मूळ कारण 'रॅट बाईट' आहे आणि त्याबाबत झालेले नुकसान विमा कव्हरमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे कंपनीला नुकसान भरपाई द्यावीच लागेल. तसेच, एकूण बिल व दंड आणि डॉ. आठल्ये यांना झालेला मानसिक ताण सर्व मिळून दंडासहित रक्कम द्यावी लागेल.
न्याय मिळाला, धडा शिकवला:अखेर, विमा लोकपालांनी कंपनीला फटकारले आणि डॉक्टरांच्या बाजूने निकाल दिला. मानसिक त्रास आणि विलंबाचा विचार करून दंडासह सर्व रक्कम परत करण्याचे आदेश दिले.
अनुभवातून काय शिकावे?हा अनुभव सांगतो की, विमा कंपन्या तांत्रिक कारणे पुढे करून हात झटकतात, पण जर आपली बाजू खरी असेल, तर 'बीमा लोकपाल' सारख्या व्यासपीठाचा वापर करून सामान्य नागरिकही न्याय मिळवू शकतो. सतर्कता आणि कायदेशीर माहिती हाच ग्राहकांचा खरा आधार आहे.
डॉ. आठल्ये यांची सोशल मीडिया पोस्ट:-
Web Summary : A doctor faced a hefty repair bill after a rat damaged his car's wiring. The insurance company refused to pay, but the Insurance Ombudsman intervened, ordering the company to cover the damages and compensate for distress.
Web Summary : एक डॉक्टर को चूहे द्वारा कार की वायरिंग को नुकसान पहुंचाने के बाद मरम्मत का भारी बिल मिला। बीमा कंपनी ने भुगतान करने से इनकार कर दिया, लेकिन बीमा लोकपाल ने हस्तक्षेप किया और कंपनी को नुकसान भरने और संकट के लिए क्षतिपूर्ति करने का आदेश दिया।