Join us  

रश्मी शुक्ला, चौकशीस उद्यापर्यंत हजर राहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 6:41 AM

सायबर पोलिसांकडून दुसरे समन्स जारी

जमीर काझी

मुंबई : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी व राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात चौकशीसाठी सायबर पोलिसांनी पुन्हा पाचारण केले आहे. साेमवार, ३ मेपर्यंत मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी हजर राहावे, असे त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहेत.

शुक्ला या प्रतिनियुक्तीवर केंद्रीय राखीव पोलीस दलात अप्पर पोलीस महासंचालक म्हणून हैदराबाद येथे कार्यरत आहेत. त्यांनी कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चौकशीला मुंबईला येण्यास नकार दिला. त्याऐवजी दाखल एफआयआरची प्रत व चौकशीतील प्रश्नांची यादी पाठवून द्यावी, असे उत्तर त्यांनी पहिल्या नोटीसला पाठविले होते. पोलीस मात्र त्यांनी स्वतः हजर राहून जबाब द्यावा, यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे त्यांना सोमवारपर्यंत चौकशीसा हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

फोन टॅपिंग प्रकरणाचा अत्यंत गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी तसेच २६ मार्चला गोपनीय पत्र व अन्य गोपनीय तांत्रिक माहिती बेकायदा उपलब्ध केल्याप्रकरणी कलम ३० भारतीय टेलिग्राफ ॲक्ट १९८५ सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ कलम ४३ (ब), ६६ सह द ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट १९२३ च्या कलम ५ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २३ मार्चला पत्रकार परिषदेत हेच प्रकरण पुन्हा जगजाहीर केले. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या प्रकरणी तपास करून शुक्ला यांनी अधिकाराचा गैरवापर व सरकारची दिशाभूल करून फोन टॅपिंग करून बनविलेला अहवाल वस्तुस्थितीदर्शक नसल्याचे नमूद केले हाेते. अहवाल त्यांच्या कार्यालयातून उघड झाल्याचेही स्पष्ट केले होते. या प्रकरणी गुन्ह्यात सायबर पोलिसांनी २६ एप्रिलला शुक्ला यांना नोटीस पाठवून २८ तारखेला मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र काेराेना संसर्गाचे कारण देत शुक्ला यांनी हजर राहण्यास नकार देत एफआयआरची कॉपी व प्रश्नावली मागविली होती.

 ...तर कारवाई होणार?रश्मी शुक्ला या त्यांना बजावण्यात आलेल्या दुसऱ्या समन्सला काय प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वेळीही त्यांनी येण्यास नकार दिल्यास हजर राहण्याबाबत त्यांना वॉरंट बजावले जाईल, त्याबाबत कायदेशीर बाबींची पूर्तता केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्ररश्मी शुक्ला