लातूरच्या तीन वर्षांच्या मुलीवर जीटी रुग्णालयात दुर्मीळ शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 03:20 AM2019-08-07T03:20:00+5:302019-08-07T03:21:15+5:30

लहान वयात असणारी कमी प्रतिकारशक्ती, त्यामुळे झालेले अनेक संसर्ग, बेडसोअर अशा अनेक समस्यांचा सामना तिला करावा लागत होता.

Rare surgery at GT hospital on a three-year-old girl from Latur | लातूरच्या तीन वर्षांच्या मुलीवर जीटी रुग्णालयात दुर्मीळ शस्त्रक्रिया

लातूरच्या तीन वर्षांच्या मुलीवर जीटी रुग्णालयात दुर्मीळ शस्त्रक्रिया

Next

मुंबई : लातूर येथील शेतमजुराची तीन वर्षांची मुलगी दीड वर्षांपासून पाठीच्या मणक्याच्या त्रासाने त्रस्त होती. मानेतून जाणाऱ्या मणक्याच्या भागावर दाब आल्याने हातापायांची हालचाल बंद होऊन तिला अंपगत्व आले होते. ती अंथरुणाला खिळून होती. उपचारांसाठी ती मुंबईतील गोकुळदास तेजपाल रुग्णालयात दाखल झाली. त्यानंतर, डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या आणि दुर्मीळ शस्त्रक्रियेच्या माध्यमातून तिच्यावर यशस्वी उपचार केले. दीड वर्षांपूवी ही मुलगी पडून तिला इजादेखील झाली होती. एवढ्या लहान वयात असणारी कमी प्रतिकारशक्ती, त्यामुळे झालेले अनेक संसर्ग, बेडसोअर अशा अनेक समस्यांचा सामना तिला करावा लागत होता. परिस्थिती हालाखीची असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नव्हते. अखेर, गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील अस्थिव्यंगप्रमुख डॉ. धीरज सोनावणे यांनी सीटी स्कॅन, एमआरआय व एक्सरेच्या माध्यमातून तिला मुलीला ‘हरलर सिंड्रोम व अटलांटोअ‍ॅक्सिल डिसलोकेशन’ असल्याचे निदान झाले. या स्थितीत डॉ. सोनावणे यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. टायटॅनियम स्क्रू हा लहान मुलीच्या मणक्यातून व एवढ्या अरुंद हाडाच्या जागेतून टाकताना मेंदूतून रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी व मज्जातंतू या दोघांना अपाय होण्याचा धोका असतो, पण हे आव्हान डॉ. सोनावणे, डॉ.ओंकार शिंदे, डॉ. बिपुल गर्ग, भूलतज्ज्ञ डॉ. गणेश कोल्हे, डॉ. श्वेता बनसोडे यांनी पेलले.

हातापायांची ताकद परत येऊ लागली
मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेमार्फत करण्यात आला. या शस्त्रक्रियेमुळे आता तिच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे, तसेच यामुळे तिच्या हातापायांची गेलेली ताकद पुन्हा परत येऊ लागली आहे.
- डॉ.अजय चंदनवाले, जे.जे. रुग्णालय समूह अधिष्ठाता.

Web Title: Rare surgery at GT hospital on a three-year-old girl from Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.