Join us

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस जामीन; स्वेच्छेने संबंध ठेवल्याचे उच्च न्यायालयाचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 16:02 IST

पंचवीसवर्षीय आरोपीशी मुलीच्या असलेल्या नात्याबाबात पालकांना कल्पना होती

मुंबई : एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंजूर केला. आपण काय करत आहोत, याची पूर्ण कल्पना असूनही ती 'स्वेच्छेने' आरोपीच्या कृत्यात सहभागी झाली, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

पंचवीसवर्षीय आरोपीशी मुलीच्या असलेल्या नात्याबाबात पालकांना कल्पना होती. तीन वर्षे आणि ११ महिने आरोपीने कारावास भोगला आणि खटला नजीकच्या काळात सुरू होण्याची शक्यता नाही, असे निरीक्षण न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने नोंदवले.

आरोपीवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, मुलीने जुलै २०२० मध्ये घर सोडले. तेव्हा मुलीच्या प्रेमसंबंधाविषयी वडिलांना कुणकुण लागली. त्यानंतर दोन दिवसांनी मुलीने ती आरोपीबरोबर त्याच्या गावी परराज्यात असल्याचे वडिलांना सांगितले. मे २०२१ मध्ये मुलीने वडिलांना फोन करून सांगितले की, ती गर्भवती असून, आरोपीने तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला. त्यानंतर ती महाराष्ट्रात परतली. मुलीच्या तक्रारीनुसार, ती आरोपीला २०१९ पासून ओळखते. मात्र, त्यांच्या पालकांना हे नाते मान्य नव्हते. आरोपीने लैंगिक संबंध ठेवले. जुलै २०२० मध्ये जेव्हा ती आरोपीबरोबर पळून गेली त्यानंतर ती गर्भवती झाली, असे मुलीने तक्रारीत म्हटले आहे.

जबरदस्तीची तक्रार नाही

आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, मुलगी १० महिने आरोपीबरोबर स्वखुशीने राहिली. त्यावेळी तिने आरोपीने शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केल्याची तक्रार केली नाही. तिच्या पालकांना मुलीचा ठावठिकाणा माहीत असूनही त्यांनी तिला परत आणण्यासाठी पावले उचलली नाही. त्यामुळे या तक्रारीबाबत प्रश्नचिन्ह आहे. न्यायालयाने आरोपीच्या वकिलांचे म्हणणे मान्य करत त्याची जामिनावर सुटका केली.

टॅग्स :मुंबईउच्च न्यायालयमुंबई पोलीस