मनसे उमेदवाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
By Admin | Updated: October 2, 2014 23:32 IST2014-10-02T23:04:37+5:302014-10-02T23:32:07+5:30
मोलकरणीची तक्रार : शिवीगाळीचाही आरोप

मनसे उमेदवाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माजी जिल्हाप्रमुख आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवार सुधाकर खाडे याने जातिवाचक शिवीगाळ करून चाळीस वर्षीय मोलकरणीवर बलात्कार केल्याचा प्रकार काल, बुधवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी पीडित महिलेने विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार खाडेविरुद्ध बलात्कार व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाडे मूळचा मिरजेतील आहे. गेल्या चार वर्षांपासून तो कुपवाड रस्त्यावरील बालाजीनगर येथील ‘शीतल’ बंगल्यात भाड्याने राहतो. पीडित महिला तेव्हापासून त्याच्याकडे मोलकरीण म्हणून आहे. खाडे तिला अनेकदा ‘तू एकटी राहतेस, तुला काय मदत लागत असेल तर माझ्याकडे येत जा. माझ्याकडे खूप पैसा आहे, मी तुला मदत करीन. तू स्वत:ला एकटी समजू नकोस, शेवटपर्यंत तुला आधार देईन’, असे सांगत असे.
सहा महिन्यांपूर्वी महिला त्याच्या घरी सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे धुणीभांडी करण्यासाठी गेली होती. खाडेची पत्नी श्वेता कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. खाडे एकटाच होता. महिला फरशी पुसत असता तो तिच्याजवळ गेला. तिला हाताला धरून बेडरूममध्ये ओढत नेले. तिथे अश्लील शिवीगाळ करून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला बंदुकीचा धाक दाखवून हा प्रकार कोणाला सांगितलास तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.
या धमकीला घाबरून महिला गप्प होती. त्याच्या घरी जायचे तिने बंद केले होते.
पंधरा दिवसांपूर्वी खाडे तिच्या घरी गेला. दरवाजाला आतून कडी लावून पुन्हा त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळीही त्याने जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
तो यापुढेही असाच अत्याचार करेल, या भीतीने महिलेने काल (बुधवार) रात्री पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे. यापूर्वीही खाडेविरुद्ध मिरजेत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्'ातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. (प्रतिनिधी)
खाडे विधानसभेचा उमेदवार
खाडे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून मनसेतर्फे तो निवडणूक लढवत आहे. सहा महिन्यापूर्वी रिव्हॉल्व्हरचा परवाना नूतनीकरण न केल्याप्रकरणी त्याला गुंडाविरोधी पथकाने अटक केली होती.