महायुतीने अव्हेरल्याने रिपाइंची राष्ट्रवादीशी चर्चा?

By Admin | Updated: March 26, 2015 00:50 IST2015-03-26T00:50:42+5:302015-03-26T00:50:42+5:30

महायुतीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांबरोबरच्या युतीची शक्यता मावळल्यात जमा आहेत.

Rapayi discusses with NCP due to absence of Mahayuti? | महायुतीने अव्हेरल्याने रिपाइंची राष्ट्रवादीशी चर्चा?

महायुतीने अव्हेरल्याने रिपाइंची राष्ट्रवादीशी चर्चा?

नवी मुंबई : महायुतीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांबरोबरच्या युतीची शक्यता मावळल्यात जमा आहेत. त्यामुळे रिपाइंच्या (आठवले) स्थानिक नेतृत्वाने राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
भाजपा किंवा शिवसेनेसोबत जाण्यास स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे. दोन्ही पक्षांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याचाच परिणाम म्हणून समविचारी पक्ष व संघटनांना सोबत घेऊन बहुजन विकास आघाडी स्थापन करण्याच्या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र अशा प्रकारची आघाडी करून एकही जागा जिंकता येणार नाही, असे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे पक्षातील एका गटाने राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू केली असून त्यांची वाशी येथे एक बैठकही झाल्याचे सूत्राने सांगितले.
नवी मुंबईत रिपाइंला मानणारा मोठा वर्ग आहे. तरी आपसातील मतभेद व गटबाजीमुळे या पक्षाला मागील २० वर्षांत महापालिकेची एकही जागा जिंकता आलेली नाही. बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केल्यास फायदा होईल, असे या गटाला वाटते आहे. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वांबरोबर या पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. रिपाइंला हव्या असलेल्या किमान आठ जागा सोडण्यास राष्ट्रवादीकडून होकार मिळाल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rapayi discusses with NCP due to absence of Mahayuti?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.