Ranveer Allahbadia Apology: 'इंडिया गॉट लेटेंट'मध्ये कुटुंबाविषयी अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि 'इंडिया गॉट लेटेंट'च्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट'चा वाद समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांचे एक पथक खार स्टुडिओमध्ये पोहोचले होते. या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होतेय. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाषण स्वातंत्र्यालाही मर्यादा आहेत असं म्हटलं. त्यानंतर आता रणवीर अलाहाबादियाने माफी मागितली आहे.
यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने एक व्हिडिओ जारी पोस्ट करत आपल्या अश्लील विधानाबद्दल माफी मागितली आहे. समय रैनाने त्याच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये केलेल्या अश्लील विधानामुळे गदारोळ झाला होता. त्याच्याविरोधात तक्रार दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी होत आहे. वाढता गोंधळ पाहून रणवीर अलाहाबादिया आता माफी मागितली आहे. माझी विधाना फक्त अयोग्यच नव्हतं तर ते मजेदारही नव्हतं असं रणवीर अलाहाबादियाने म्हटलं आहे.
"माझे विधान केवळ अयोग्यच नव्हते तर ते मजेदारही नव्हते. कॉमेडी ही माझी खासियत नाही. मी इथे फक्त माफी मागायला आलो आहे. जे घडले त्यामागे मी कोणताही संदर्भ किंवा तर्क देणार नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे. वैयक्तिकरित्या माझ्याकडून निर्णय घेण्यात चूक झाली.,” असं रणवीर अलाहाबादियाने म्हटलं.
"पॉडकास्ट सर्व वयोगटातील लोक ऐकतात. त्यामुळे ही जबाबदारी हलक्यात घेईल अशी व्यक्ती मला व्हायचं नाही. कुटुंब ही शेवटची गोष्ट आहे ज्याचा मला कधीही अनादर करायचा नाही. मला या प्लॅटफॉर्मचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्याची गरज आहे, या संपूर्ण अनुभवातून मी हेच शिकलो आहे. मी आणखी चांगले होण्याचे वचन देतो. मी व्हिडिओच्या निर्मात्यांना व्हिडिओमधून असंवेदनशील भाग काढून टाकण्यास सांगितले आहे आणि शेवटी मी एवढेच म्हणू शकतो की मला माफ करा, मला आशा आहे की तुम्ही एक माणूस म्हणून मला माफ कराल," असंही रणवीर म्हणाला.
भाषण स्वातंत्र्यालाही मर्यादा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"या शोमध्ये अपमानास्पद आणि अश्लील गोष्टी बोलल्या गेल्याचे माझ्या निदर्शनास आले जे चुकीचे आहे. प्रत्येकाला भाषणस्वातंत्र्य आहे पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतो तेव्हा आपले स्वातंत्र्य संपते. भाषण स्वातंत्र्यालाही मर्यादा आहेत. आपल्या समाजात आपण अश्लीलतेबाबतही काही नियम तयार केले आहेत. जर ते नियम कोणी ओलांडले असतील ही चुकीची गोष्ट आहे. असे काही घडले असेल तर नक्कीच कारवाई केली जाईल," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
रणवीर अलाहाबादियाचे अश्लील विधान
रणवीरने शोमधील एका स्पर्धकाला 'तुला आयुष्यभर तुझ्या आई-वडिलांना दररोज जवळीक साधताना बघायला आवडेल की एकदा त्यांच्यासोबत सामील व्हायला आवडेल?' असा धक्कादायक प्रश्न विचारला. हे ऐकल्यानंतर समय रैनाने हे सर्व पॉडकास्टचे नाकारलेले प्रश्न आहेत. हा कसला प्रश्न आहे? असं म्हटलं.