लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत चढ-उत्तर पाहायला मिळत आहेत. २०२४-२५ या वर्षात पर्यटकांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे. २३ लाख ५७ हजार पर्यटकांनी येथे भेट देत पालिकेच्या तिजोरीत ९.१८ कोटी रुपयांची भर घातली आहे. मात्र, २०२३-२४ मध्ये २८ लाख पर्यटकांनी ११.४६ कोटींचा महसूल दिला होता.
२०२३-२३ मध्ये वाढ २०१९ ते २०२५ या वर्षांचा आढावा घेतल्यास २०२२-२३ या वर्षात सर्वात जास्त पर्यटकांनी प्राणी संग्रहालयास भेट दिली होती. या वर्षात महसूलही घसघशीत मिळाला होता. तर, सर्वात कमी पर्यटक २०२१-२२ या वर्षात आले होते. परिणामी महसुलाचे प्रमाणही कमी झाले होते.
कोरोना काळात उद्यान ठेवले होते बंद कोरोनामुळे ५ एप्रिल २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत प्राणी संग्रहालय बंद होते.
नवे प्राणी, पशु-पक्षी आल्यावरच वाढतात पर्यटक एखादी व्यक्ती उद्यानाला वर्षातून फारतर दोन वेळा भेट देते. सातत्याने भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण नगण्य असते. एकदा उद्यान पाहिल्यावर सहसा दुसऱ्यांदा त्या ठिकाणी जाणे होत नाही. नवे प्राणी किंवा पशु-पक्षी आले तर पर्यटकांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत चढ-उत्तर अपेक्षित असते, असे उद्यानातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सध्या पावसाळा सुरू असल्याने अन्य ठिकाणांहून नवे प्राणी किंवा पशु-पक्षी आणले जात नाहीत. काही दिवसांपूर्वीच प्राणी संग्रहालयात सुसरींचे आगमन झाले आहे.