राणीबागेची सुरक्षा राम भरोसे !
By Admin | Updated: January 24, 2015 00:55 IST2015-01-24T00:55:19+5:302015-01-24T00:55:19+5:30
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेची सुरक्षा सध्या राम भरोसे असल्याचे चित्र आहे.

राणीबागेची सुरक्षा राम भरोसे !
मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेची सुरक्षा सध्या राम भरोसे असल्याचे चित्र आहे. राणीबागेतील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयामागील मैदानाला जोडून असलेल्या सुरक्षा भिंतीला हत्तीएवढे मोठे भगदाड पडल्याने चोरट्यांसह गर्दुल्ले सहज प्रवेश करून प्रशासनाच्या मालमत्तेवर डल्ला मारत आहे.
वस्तू संग्रहालयामागील खेळाच्या मैदानाची एक भिंत प्राणिसंग्रहालयाला जोडली गेलेली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या भिंतीला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे मैदानातून प्राणिसंग्रहालयात प्रवेश करण्यासाठी स्थानिकांसह चोरट्यांना वाट मिळाली आहे. याठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला मोठ्या पट्ट्यात टेहळणी करावी लागत असल्याने त्याची नजर चुकवून कोणीही सहज प्रवेश मिळवू शकतो. परिणामी प्रशासनाची मालमत्ता प्रशासनाच्या नजरेसमोरून चोरीला जात आहे.
खूप वर्षांपूर्वी बांधलेल्या भिंतीची वारंवार डागडुजी करूनही पडझड होत असल्याची प्रतिक्रिया प्राणिसंग्रहालयाचे संचालक अनिल अंजनकर यांनी दिली. त्यामुळे भिंतीची पुनर्बांधणी करण्यात येणार असून त्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. परिणामी लवकरच मजबूत संरक्षण भिंत उभारण्यात येणार असल्याचे अंजनकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
़़़तर जबाबदार कोण ?
संरक्षण भिंतीला असलेल्या बोगद्यातून प्रवेश केल्यानंतर समोरच हत्तीचा पिंजरा आहे. त्यामुळे एखाद्या समाजकंटकाकडून येथून प्रवेश करून हत्तीला इजा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय प्रवेशद्वाराइतकी जागा चोरट्यांना उपलब्ध झाल्याने एखादा प्राणी किंवा पक्षी चोरीला गेल्यास त्यास जबाबादार कोण, असा सवाल स्थानिक अजय लांडे यांनी विचारला आहे.