Join us
Daily Top 2Weekly Top 5

राणीबागेच्या विस्तार योजनेला मिळणार गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 06:34 IST

विदेशी पाहुण्यांची लागणार उद्यानात हजेरी

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाजवळ २७ हजार २८४.३६ चौरस मीटर आकाराचा भूखंड आहे. या भूखंडाच्या हस्तांतरणाविरुद्धची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे या भूखंडावर उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करण्याच्या पालिकेच्या योजनेला गती मिळणार आहे. शुक्रवारी या भूखंडाचा प्रत्यक्ष ताबा महापालिकेकडून घेण्यात आला आहे. भविष्यात येथे विदेशी प्राणी ठेवले जाणार असून यासाठी आफ्रिकन, आॅस्टेÑलियन झोन, साऊथ अफ्रिका झोन, साऊथ ईस्ट एशिया झोन, प्रिमेट आइसलँड आणि फ्लेमिंग आइसलँड असे विभाग उभारण्यात येणार आहेत. महापालिकेकडून याबाबतचा प्रस्ताव भारत सरकारच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला पाठवला जाणार असून, संबंधितांकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात येथे या योजना साकारल्या जातील.प्राणिसंग्रहालय परिसरालगत २७ हजार २८४.३६ चौरस मीटर आकाराचा भूखंड आहे. याच भूखंडावर उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करण्याची महापालिकेची योजना आहे. हा भूखंड मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांनुसार ७ जानेवारी २०१७ रोजी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. याविरोधात मफतलाल इंडस्ट्रीजने उच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती.काय आहे प्रकरण?महापालिकेच्या ई विभाग कार्यक्षेत्रात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) आहे. या उद्यानालगत सुमारे ५४ हजार ५६८.७२ चौरस मीटर आकाराचा भूखंड आहे. माझगाव विभागातील सीएस ५९३ क्रमांकाचा हा भूखंड मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेडला भाडेपट्ट्याने देण्यात आला होता.याबाबत महाराष्ट्र शासनाद्वारे वर्ष २००४ मध्ये काढलेल्या अधिसूचनेआधारे व सदर भाडेपट्ट्याचा कालावधी वर्ष २०१७ मध्ये संपल्यानंतर; मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयांद्वारे सदर भूखंडाच्या निम्मा (५० टक्के) म्हणजेच २७ हजार २८४.३६ चौरस मीटर एवढ्या आकाराचा भूभाग महापालिकेकडे वर्ग करण्यात आला होता.

टॅग्स :मुंबई