राणीबागचा बसथांबा की दारूड्यांचा अड्डा?
By Admin | Updated: December 27, 2014 00:57 IST2014-12-27T00:57:23+5:302014-12-27T00:57:23+5:30
भायखळा पूर्वेकडील ई.एस. पाटणवाला मार्गावर असलेल्या राणीबागचा बसथांबा सध्या मद्यपींचा अड्डा बनला आहे.

राणीबागचा बसथांबा की दारूड्यांचा अड्डा?
भायखळा : भायखळा पूर्वेकडील ई.एस. पाटणवाला मार्गावर असलेल्या राणीबागचा बसथांबा सध्या मद्यपींचा अड्डा बनला आहे. याठिकाणी सुरू असलेल्या अनधिकृत चायनीजच्या गाडीवर रोज रात्री तळीरामांची मैफिल जमत असल्याने स्थानिकांमधून कारवाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
अजय बार अॅण्ड रेस्टॉरन्टसमोर असलेला हा बसथांबा म्हणजे राणीबाग बस डेपोआधीचा शेवटचा थांबा आहे. गेल्या काही महिन्यांपासून याठिकाणी चायनीज, पावभाजी आणि भूर्जीपावचा अनधिकृती स्टॉल सुरू आहे. मात्र स्थानिक पालिका अधिकारी आणि पोलिसांमार्फत या प्रकाराकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी मनोधैर्य वाढलेल्या या चायनीज विकेत्याने मद्यपींसाठी तीन बाकडे लावून याठिकाणीच बार उघडल्याचे चित्र निदर्शनास येते.
स्थानिक राजकीय नेते आणि पोलिसांना याठिकाणचे हफ्ते जात असल्याचा आरोप एका सुजाण नागरिकाने केला आहे. त्यामुळे पालिका किंवा पोलिसांत तक्रार करण्यास नागरिक धजावत नसल्याचे त्याने सांगितले. परिणामी या प्रकाराबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्या तरी तक्रार केली जात नाही.