धोकादायक इमारतीला रंगरंगोटी
By Admin | Updated: December 21, 2014 23:19 IST2014-12-21T23:19:41+5:302014-12-21T23:19:41+5:30
येथील सरकारी रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचा राज्य लघुउद्योग विकास मंडळाचा अहवाल असतानाही तो दडवून त्याच इमारतीच्या नूतनीकरणासाठी साडेदहा कोटी

धोकादायक इमारतीला रंगरंगोटी
अलिबाग : येथील सरकारी रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचा राज्य लघुउद्योग विकास मंडळाचा अहवाल असतानाही तो दडवून त्याच इमारतीच्या नूतनीकरणासाठी साडेदहा कोटी रुपये मंजूर करुन त्यापैकी साडेपाच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाच्या या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याची चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांना दिले.
जिल्हा ठिकाणी असणारी आरोग्यव्यवस्था सक्षम असावी यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियांतर्गत कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद सरकारकडून करण्यात येते. अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी आणि नूतनीकरणासाठी सुमारे साडेदहा कोटी रुपये मंजूर केले होते, मात्र ही इमारत मोडकळीस आली असून या इमारतीचे नूतनीकरण अथवा सुशोभीकरण करु नये असा अभिप्राय राज्य लघुउद्योग विकास मंडळाने दिला आहे. सरकारच्याच एका घटकाने असे आदेश दिले असताना सुशोभीकरणाचे काम सुरु कसे होते आणि त्यावर आतापर्यंत साडेपाच कोटी रुपये खर्च झालेच कसे? असा सवाल माजी आमदार ठाकूर यांनी केला.
३२ वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा त्याच पैशात नवीन इमारत बांधणे सोयीचे झाले असते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी एका खासगी एजन्सीमार्फत इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करुन घेतले आणि दुरुस्तीचा अहवाल प्राप्त केला असाही आरोप ठाकूर यांनी केला आहे. (प्रतिनिधी)