शक्तिप्रदर्शन करीत राणेंचा अर्ज
By Admin | Updated: March 25, 2015 02:31 IST2015-03-25T02:31:05+5:302015-03-25T02:31:05+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

शक्तिप्रदर्शन करीत राणेंचा अर्ज
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणा देत वांद्रे पूर्वेकडील परिसर दणाणून सोडला.
खेरवाडी नाक्यावरून मिरवणुकीने नारायण राणे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले तेव्हा पक्षाच्या झेंड्यांनी येथील वातावरण फुलून गेले होते. निवडणूक कार्यालयाजवळ मिरवणूक दाखल झाल्यानंतर खेरवाडी, भारतनगर, बेहराम पाडा, एमआयजी कॉलनी, शासकीय वसाहतीतील नागरिक येथे जमा झाले होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम, माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष कृपाशंकर सिंह, माजी खासदार प्रिया दत्त, आ. वर्षा गायकवाड, आमदार जनार्दन चांदूरकर, रिपाइं (गवई गट)चे राजेंद्र गवई, माजी खासदार संजय पाटील, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन अहिर, आ. जितेंद्र आव्हाड, आ. नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे हे या वेळी उपस्थित होते.
वांद्रे पूर्वचा विकास करणार - राणे
मला कोकणच्या जनतेने निवडून दिल्यानंतर त्या भागाचा जसा विकास
करून कायापालट केला, तसाच विकास मी वांद्रे पूर्व या भागात करीन, असे आश्वासन नारायण राणे यांनी दिले. या मतदारसंघाचे अनेक प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प अर्धवट पडलेले आहेत. हे सर्व प्रश्न आपण सोडवू, असे आश्वासनही राणे यांनी दिले.