राणा कपूरला ३० जानेवारीपर्यंत ईडी कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:31 IST2021-02-05T04:31:33+5:302021-02-05T04:31:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : येस बँकेचा संस्थापक राणा कपूर याला विशेष पीएमएलए न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावली. ...

Rana Kapoor to be remanded in ED custody till January 30 | राणा कपूरला ३० जानेवारीपर्यंत ईडी कोठडी

राणा कपूरला ३० जानेवारीपर्यंत ईडी कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : येस बँकेचा संस्थापक राणा कपूर याला विशेष पीएमएलए न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावली. डीएचएफएल प्रकरणी ईडीने मार्च २०२० मध्ये अटक केली होती. ईडीने ताबा घेईपर्यंत राणा कपूर तळोजा कारागृहात होता.

एचडीआयएलची दुसरी कंपनी मॅकस्टरप्रकरणी ईडीने राणा कपूरविरोधात आणखी एक ईसीआयआर नोंदविला आहे. त्यात आणखी दोन आरोपींचा समावेश आहे. मदन गोपाळ चतुर्वेदी आणि मेहूल ठाकूर अशी या आरोपींची नावे आहेत. मेहूल ठाकूर हा राज्याचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा पुतण्या आहे. जयेंद्र ठाकूर ऊर्फ भाई ठाकूर यांच्या घरी व विवा ग्रुपच्या कंपनीवर छापा टाकल्यावर ईडीने मेहूल ठाकूर व मदन गोपाळ चतुर्वेदी यांना २३ जानेवारी रोजी अटक केली.

चतुर्वेदी व ठाकूर यांची चौकशी केल्यावर या प्रकरणाशी राणा कपूर याचा संबंध असल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली.

मॅकस्टरही एचडीआयएलचीच कंपनी आहे. मॉरिशसच्या एका कंपनीच्या मालकांनी व एचडीआयएलने ही कंपनी स्थापली आहे. मॉरिशसच्या कंपनीची ७९ टक्के भागीदारी मॅकस्टरमध्ये आहे. उर्वरित भागीदारी एचडीआयएलची आहे. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, एचडीआयएलने येस बँकेकडून २०३ कोटी रुपयांचे कर्ज घेताना त्यांची संपत्ती बँकेकडे तारण ठेवली. हे कर्ज नवीन प्रॉपर्टीच्या दुरुस्तीसाठी वापरले. मात्र, याची काहीही आवश्यकता नव्हती. हे कर्ज मुद्दाम उचलण्यात आले आणि एचडीआयएलचे कर्ज फेडण्यासाठी हे पैसे वापरले.

कपूर याच्यातर्फे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी कपूर याचा ताबा ईडीकडे देण्यास नकार दिला. ईडी कपूरची चौकशी कारागृहात करू शकते. त्याचा ताबा घेण्याची आवश्यकता नाही, असे पोंडा यांनी सांगितले. मात्र, न्यायालयाने पोंडा यांचा युक्तिवाद फेटाळत कपूर याला ३० जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावली.

------------------

Web Title: Rana Kapoor to be remanded in ED custody till January 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.