Join us

Ramdas Athwale: 'शौर्य अन् धैर्याचा महामेरू, माता 'जिजाऊ'च शिवाजी महाराजांच्या गुरू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:11 IST

Ramdas Athwale: भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानानंतर राज्यात विविध ठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले.

मुंबई - समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू होते, या राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या वक्तव्याने राज्यात गोंधळ उडाला आहे. या वक्तव्याचे सर्मथन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले होते. पिंपरी चिंचवड महापालिका विविध विकासकांच्या उद्घाटन करण्यासाठी आठवले आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. मात्र, त्यांच्या या विधानानंतर त्यांनी ट्विटरवरुन पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, शिवाजी महाराज हे स्वयंभू होते, असेही त्यांनी सांगितले. 

भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानानंतर राज्यात विविध ठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. मात्र, या विधानाबाबत कोश्यारी यांनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिलं. 'छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणा स्त्रोत आहेत. मला जितकी माहिती होती, त्यानुसार समर्थ रामदासजी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते. परंतु, इतिहासाचे काही नवीन तथ्य मला सांगितले. ती तथ्य मी पाहीन', अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. आता, रामदास आठवलेंनीही ट्विटरवरुन शिवाजी महाराजांच्या गुरू माता जिजाऊ याच होत्या, असे म्हटलंय. 

'छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभू राजे होते. शौर्य आणि धैर्याचे महामेरू होते.त्यांना गुरू ची गरज नव्हती. त्यांच्या गुरू माता जिजाऊ याच होत्या. अन्य कोणी त्यांचा गुरू होऊ शकत नाही', असे ट्विट आठवलेंनी केले आहे.  काय म्हणाले होते आठवले

आठवले म्हणाले, ''शिवाजी महाराजांच्या संदर्भात राज्यपाल काय म्हटले, ते तपासायला हवे. मी वर्तमानपत्र वाचून जे समजले त्यावरून रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यावरून वाद सुरू झाला आहे. मला वाटते,  राज्यपालांच्या व्यक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते. त्यांना रामदास स्वामी यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन होते. त्यावरून शिवरायांचे रामदास गुरू होते, असे संदर्भ आहेत.''राज्यपालांनी माफी मागायला हवी का या प्रश्नांवर आठवले म्हणाले, '' माफी मागण्याचा प्रश्न कुठे येतो.'' असे राज्यपालांचे समर्थन केंद्रीय मंत्री आठवले यांनी केले. 

टॅग्स :मुंबईछत्रपती शिवाजी महाराजरामदास आठवले