Join us

कॅम्लिनच्या रजनी दांडेकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 08:33 IST

अनेक चित्रकार, चित्रकला शिक्षक, कलावंत आणि विद्यार्थी यांना प्रोत्साहन देत दांडेकर कुटुंबीयांनी कॅम्लिन व चित्रकला उद्योगाला चालना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चित्रकलेसाठी लागणाऱ्या रंगांबरोबरच शालेय साहित्याच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या कॅम्लिन या प्रख्यात कंपनीच्या मार्केटिंग विभागाच्या प्रमुख, सुभाष दांडेकर यांच्या पत्नी रजनी दांडेकर (वय ८०) यांचे गुरुवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती सुभाष दांडेकर, मुलगा आशिष, मुलगी अनघा असा परिवार आहे. 

अनेक चित्रकार, चित्रकला शिक्षक, कलावंत आणि विद्यार्थी यांना प्रोत्साहन देत दांडेकर कुटुंबीयांनी कॅम्लिन व चित्रकला उद्योगाला चालना दिली. सुभाष आणि रजनी दांडेकर यांनी २००१ मध्ये कॅम्लिन फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनच्या माध्यमातून दांडेकर दाम्पत्याने समाजोपयोगी विविध उपक्रम राबवले. गेल्या काही दिवसांपासून रजनी आजारी होत्या. लोणावळ्याच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

चतुरस्र व्यक्तिमत्त्व  

रजनी कॅम्लिन परिवाराचा अविभाज्य भाग होत्या. रंग, कला व चित्रकार याची उत्तम सांगड त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. कॅम्लिनसाठी रंगनिवड, देश-विदेशात कॅम्लिन उत्पादनांचे प्रदर्शन भरवणे अशा जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमपणे सांभाळल्या. हौशी कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या कॅम्लिन फाउंडेशनची संकल्पना त्यांचीच होती. ही जबाबदारी सांभाळतानाच स्वतःच्या कुटुंबाकडेही तितकेच लक्ष दिले. मुलगा आशिष आणि कन्या अनघा यांचे शिक्षण, त्यांचे करिअर, कौटुंबिक जबाबदाऱ्या, नातेवाइकांशी योग्य समन्वय आदींकडे रजनी यांचा तितकाच कटाक्ष असायचा. रुचकर पदार्थ बनवणे व त्यात नावीन्यपूर्ण प्रयोग करणे यांचीही आवड रजनीताईंना होती. रजनीताईंच्या जाण्याने व्यावसायिक आणि व्यक्तिगत आयुष्य यांचा उत्तम समतोल साधणारे व्यक्तिमत्त्व हरपले. 

टॅग्स :मुंबई