Join us  

झेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 8:03 PM

मनसेच्या झेंड्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून मनसे पक्ष

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आपल्या भूमिकेतील बदल दाखवून दिल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन मुंबईत पार पडत आहे. या महाअधिवेशनात ढोल ताशांच्या गजरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर, संध्याकाळच्या भाषणात राज यांनी आपल्या झेंड्यावरील राजमुद्रासंदर्भातील भूमिकाही स्पष्ट केली. 

मनसेकडून दोन झेंड्याचा वापर करण्यात येणार आहे. त्यानुसार, राजमुद्रा असलेला झेंडा निवडणुकांवेळी वापरण्यात येणार नसल्याचं राज यांनी स्पष्ट केलंय. मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. त्यामुळे, राजमुद्रा ही आमची प्रेरणा आहे, असे म्हणत राज यांनी राजमुद्राच्या वादावर तोडगा काढला. ''हा सर्वसाधारण झेंडा नाही ह्यावर महाराजांची राजमुद्रा आहे त्यामुळे त्याचा सन्मान राखणं ही आपली जबाबदारी आहे. निवडणुकीच्या वेळेस राजमुद्रेचा झेंडा वापरायचा नाही, त्याचा आब राखला गेलाच पाहिजे'', असे राज यांनी म्हटले.

मनसेच्या झेंड्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून मनसे पक्ष आणि राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज पुण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर यांना देण्यात आला आहे. राजमुद्रेचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने करणे चुकीचा असून राजमुद्रेचा झेंड्यात वापर करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राज ठाकरे यांना नाही असे या तक्रार अर्जात म्हंटले आहे. तसेच राजमुद्रेच्या वापरामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून मनसेच्या विराेधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी ब्रिगेडकडून करण्यात आली होती. मात्र, राज यांनी आपल्या भाषणात राजमुदा विषयावरील वादाचा मुद्दाही खोडून काढलाय.  मनसेच्या राजकीय वाटचालीत प्रथमच दिवसभराचे राज्यस्तरीय महाअधिवेशन होत असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. राज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करुनच आपला अजेंडा स्पष्ट केला. तसेच, मराठी आणि हिंदू याबद्दलही राज यांनी स्पष्टीकरण दिलंय.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेछत्रपती शिवाजी महाराजमुंबई