निसर्गयात्रींनी केला राजमाची गडाचा अभ्यास
By Admin | Updated: March 29, 2015 22:22 IST2015-03-29T22:22:35+5:302015-03-29T22:22:35+5:30
गड-किल्ल्यांनी सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, कदंब, आदिलशाही, शिवशाही, पेशवाई अशा अनेक राजवटी पाहिल्या. मात्र काळाच्या ओघात इतिहास पाहणारे

निसर्गयात्रींनी केला राजमाची गडाचा अभ्यास
राकेश खराडे, मोहोपाडा
गड-किल्ल्यांनी सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, कदंब, आदिलशाही, शिवशाही, पेशवाई अशा अनेक राजवटी पाहिल्या. मात्र काळाच्या ओघात इतिहास पाहणारे, ते अनुभवणारे आणि त्याचा साक्षीदार असलेले हे गड-किल्लेच ढासळलेले आहेत. काही ठिकाणी तर ते शेवटच्या घटका मोजत आहेत. अशाच गड-किल्ल्यांना अनुभवण्यासाठी, त्यांची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तो रसायनी येथील निसर्गयात्री असोसिएशनने. खंडाळा - लोणावळ्याजवळील राजमाची या ऐतिहासिक गडाची अभ्यासपूर्ण सहल घडली.
मुंबईहून पुण्याकडे जाताना डाव्या बाजूला खंड्याळ्याच्या राजमाची पॉइंटवरून हे भव्य पठार दिसते. त्या पठारामागेच उधेवाडी आहे. त्या वाडीला लागून दोन किल्ले दिसतात. तेच राजमाचीचे दोन गड आहेत. उजवीकडचा थोडा उंच श्रीवर्धन गड व डावीकडे थोड्या कमी उंचीचा मनरंजन गड आहे. दोन्ही गडाच्या खिंडीत एक पठार आहे. त्या पठारावर भैरवनाथाचे मंदिर आहे. त्या मंदिरापुढील एक रस्ता श्रीवर्धन गडावर, तर मंदिरामागील रस्ता मनरंजन गडावर जातो. या दोन्ही गडाचे वर्णन सुप्रसिध्द साहित्यिक गो. नी. दांडेकर यांनी ‘माची वरला बुधा’ या कादंबरीत केले आहे. ‘माची वरला बुधा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या राजमाची गडाचे चित्रीकरणही येथे केल्याचे रसायनी येथील निसर्गयात्री असोसिएशनचे सल्लागार व गड -किल्ले अभ्यासक अनिल दाभाडे यांनी सांगितले.
राजमाचीच्या श्रीवर्धन व मनरंजन या गडाविषयी अधिक माहिती देताना गड -किल्ले अभ्यासक दाभाडे म्हणाले, प्राचीनकाळातील हे गड केवळ टेहळणीसाठीच होते. या अभ्यास सहलीत फ्रान्सिस मार्टीन, सुरेश गिरी, किशोर जोशी, अनंत केदारी, भास्कर कोंडीलकर, कमलाकर कावडे, सुरेश पाटील हे सहभागी झाले होते.