बोरीवलीच्या राजेंद्रनगरची वाहतूककोंडी सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 01:24 IST2019-09-20T01:24:19+5:302019-09-20T01:24:22+5:30
महापालिकेने बोरीवली येथील राजेंद्रनगरमधील रस्त्यावरील सात दुकानांवर बुधवारी कारवाई केली.

बोरीवलीच्या राजेंद्रनगरची वाहतूककोंडी सुटणार
मुंबई : महापालिकेने बोरीवली येथील राजेंद्रनगरमधील रस्त्यावरील सात दुकानांवर बुधवारी कारवाई केली. सद्य:स्थितीत येथील वाहतूककोंडीतून बाहेर पडण्यासाठी ९ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेण्यात आलेले आहे.
बोरीवली पूर्व व पश्चिमेस जोडणाऱ्या महत्त्वाच्या ३६.६ मीटर रुंदीच्या राजेंद्रनगरस्थित डी. पी. रोडवरील झोपड्यांमुळे वाहतूककोंडी नागरिकांना सहन करावी लागत होती. खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार विनोद तावडे व नगरसेविका आसावरी पाटील यांच्या प्रयत्नांती बाधित झोपड्यांमधून तात्पुरत्या स्वरूपात ९ मीटर रुंदीच्या रस्त्याचा भाग एसआरए विकासकांकडून महापालिकेला हस्तांतरित करण्यात आला. ९ मीटर रुंदीच्या रस्ता निर्माणाला पश्चिम टोकाला असलेल्या ७ व्यावसायिक गाळेधारकांना संक्रमण शिबिरात जागा उपलब्ध करून दिली. खासदार शेट्टी यांनी संगितले, येथील झोपड्या स्थलांतरित केल्या होत्या. मात्र विकासकामुळे या कामाला उशीर झाला. अजूनही येथील एसआरएचे काम सुरू झालेले नाही. तर सदर ठिकाणी करिअप्पा उड्डाणपुलाचा पुढे विस्तार केल्यास राजेंद्रनगर-दत्तपाडा विभागातील वाहतूक समस्येचा प्रश्न मार्गी लागेल, असे भाजपचे सुधीर परांजपे यांनी स्पष्ट केले.