मुंबई - मुंबई : सत्यनिष्ठ पत्रकारिता, लोकशिक्षण आणि लोकसेवेद्वारे सामाजिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ आणि महाराष्ट्र सरकारचे माजी कॅबिनेट मंत्री राजेंद्र दर्डा यांना 'वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स, इंग्लंड'ने 'ह्युमॅनिटी लीडरशिप अवॉर्ड २०२५'ने सन्मानित केले. इंग्लंडमधील मान्यताप्राप्त संस्था असलेल्या 'वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स'ने मुंबईत अलीकडेच हा पुरस्कार समारंभ आयोजित केला होता.
एक दूरदर्शी संपादक, सुधारणावादी नेते आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत सर्वोच्च मानके कायम ठेवली आहेत. त्यांनी प्रशासनात परिवर्तनकारी सुधारणा धारणा घडवून आणल्या आणि मानवतावादी कार्याना चालना दिली. त्यांच्या पाच दशकांच्या सेवेतून संवाद, विकास आणि प्रतिष्ठेचा वारसा दिसून येतो, असे गौरवोद्गार आयोजकांनी पुरस्कार प्रदान करताना काढले.
या प्रतिष्ठित कार्यक्रमात समाजातील अद्वितीय योगदानाबद्दल विविध क्षेत्रांतील व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करण्यात आले. इंग्लंड, अमेरिका, नेपाळ आणि भारताच्या १५ राज्यांतील दिग्गजांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंग्लंडचे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. दिवाकर सुकुल, अमेरिकेतील प्रख्यात शास्त्रज्ञ प्रा. डॉ. मधू कृष्णन, इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सुरदास प्रभू आणि 'वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स'चे ब्रँड अॅम्बेसेडर डॉ. सोहिनी शास्त्री उपस्थित होते.
या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिकसह इतर क्षेत्रांतील दिग्गजांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन 'वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स'चे उपाध्यक्ष संजय पंजवानी यांनी केले.