राजाबाई टॉवरला नवी झळाळी

By Admin | Updated: May 13, 2015 00:43 IST2015-05-13T00:43:10+5:302015-05-13T00:43:10+5:30

मुंबईच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरला नवी झळाळी मिळाली आहे. विदेशातील पर्यटकांसाठी या ऐतिहासिक

Rajabai towers get a new light | राजाबाई टॉवरला नवी झळाळी

राजाबाई टॉवरला नवी झळाळी

मुंबई : मुंबईच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरला नवी झळाळी मिळाली आहे. विदेशातील पर्यटकांसाठी या ऐतिहासिक आणि भव्य वास्तूचे आठवड्यातून एकदा हेरिटेज वॉक आयोजित केले जाईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनी मंगळवारी केली.
एकोणिसाव्या शतकातील जगविख्यात आर्किटेक्ट सर जॉर्ज गिलबर्ट स्कॉट यांच्या कल्पनेतून खास गॉथिक शैलीत साकारलेल्या राजाबाई क्लॉक टॉवर आणि ग्रंथालय या ऐतिहासिक वास्तूच्या जीर्णोद्धाराचा दिमाखदार सोहळा मंगळवारी पार पडला. या सोहळ्याला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र, कुलसचिव डॉ. एम.ए. खान यांच्यासह टीसीएसचे सीईओ आणि एमडी एन.चंद्रशेखरन, इंडियन हेरिटेज सोसायटीच्या अध्यक्षा अनिता गरवारे, प्रसिद्ध वास्तुविशारद वृंदा सोमय्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या ऐतिहासिक वास्तूचे जीर्णोद्धार करताना आम्हाला आनंद होत असून ही ऐतिहासिक वास्तू आजपासून खुली करण्यात आली आहे. राजाबाई टॉवरच्या उभारणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे मुंबईतील ख्यातनाम उद्योजक प्रेमचंद रॉयचंद यांच्या नावे गोल्ड मेडल दिले जावे यासाठीचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेपुढे ठेवण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर म्हणाले.
मागील एक वर्षापासून या ऐतिहासिक वास्तूच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होते. या ऐतिहासिक टॉवरच्या शुशोभीकरणासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने चार कोटी २० लाख रुपयांची देणगी दिली आहे. या टॉवरच्या खाली अत्यंत जुने आणि तब्बल चौदाव्या शतकापासूनचे दुर्मीळ ग्रंथ, हस्तलिखिते, चित्रकृती असलेल्या ग्रंथालयाचाही जीर्णोद्धार करण्यात आला असून अत्यंत सुसज्ज आणि आधुनिक सोयी-सुविधायुक्त असे हे ग्रंथालय करण्यात आले आहे.
१८७८ मध्ये हा टॉवर उभारण्यात आला असून तो २८० फूट उंच आहे. गॉथिक रचनाशैलीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या टॉवरच्या कामात शैली जतन करण्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. वेनेटियन आणि गॉथिक या वास्तुकलेच्या मिलाफासह बांधकाम करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rajabai towers get a new light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.