Join us  

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019: राज ठाकरेंची 'एका शब्दात' प्रतिक्रिया; काय म्हणाले पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 5:04 PM

देशभरासह राज्यभरात काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुतेक उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत.

मुंबई- देशभरासह राज्यभरात काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुतेक उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत. तर सेना-भाजपाच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी निर्णायक आघाडी मिळवली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी सभा घेऊनही त्यांच्या उमेदवारांना यश मिळालेलं नाही. त्यानंतर आता राज ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीतील निकाल हा अनाकलनीय असल्याचं राज ठाकरेंनी ट्विट करत म्हटलं आहे. राज ठाकरेंची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधत राज्यभरात सभा घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांचा फारसा परिणाम झाल्याचं दिसलं नाही.राज यांनी सभा घेतलेल्या जवळपास सगळ्याच मतदारसंघांमध्ये भाजपा आणि शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारल्याचं आकडेवारीमधून समोर आलं आहे. 

पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना देशाच्या राजकीय क्षितिजावरुन हटवा, असं आवाहन राज यांनी जनतेला केलं होतं. त्यासाठी त्यांनी नांदेड, सोलापूर, सांगली, पुणे, रायगड, शिवडी, भांडूप, शिरुर, नाशिकमध्ये सभाही घेतल्या होत्या. मात्र यातील जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. राज्यातील 48 पैकी 40 जागांवर शिवसेना-भाजपाचे उमेदवार पुढे आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार तीन मतदारसंघात आघाडीवर आहेत. काँग्रेसला एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही. 

टॅग्स :राज ठाकरेलोकसभा निवडणूक २०१९महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019