Join us  

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या जिवाला धोका?; धमक्यांचे फोन आणि मेसेज येत असल्याचा मनसेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 5:39 PM

३ मे रमजान होईपर्यंत सर्व मौलवींशी चर्चा करून सरकारने भोंगे हटवावेत त्यानंतर आमचा कुठलाही त्रास होणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत केलेल्या विधानावरून राज्यासह देशभरात वातावरण पेटलं आहे. राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत सरकारला मुदत दिली असून भोंगे हटवले पाहिजे अन्यथा मशिदीच्या बाहेर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला आहे. त्याचसोबत त्यांनी देशभरातील हिंदूंना तयार राहण्याचं आव्हानं केले आहे. ३ मेनंतर जशास तसं उत्तर देऊ असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे मुस्लीम समाजात राज ठाकरेंबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मांडल्यानंतर आता यावरून त्यांना धमकीचे फोन असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर(Bala Nandgoankar) यांनी दिली आहे. राज ठाकरेंना येणारे धमकीचे फोन पाहता त्यांच्या संरक्षणासाठी Z प्लस सुरक्षा द्यावी असं नांदगावकरांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंना आलेल्या धमकीचे मेसेज आपण स्वत: वाचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने फोन आणि मेसेज येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्या मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार आहे.

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भोंगे हटवण्याबाबत मागणी केली होती. त्यांच्या या विधानामुळे मनसेच्या मुस्लीम कार्यकर्त्यांमध्येही नाराजी पसरली होती. त्यानंतर उत्तर सभा घेत राज ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केले पाहिजे. त्यामुळे ३ मे रमजान होईपर्यंत सर्व मौलवींशी चर्चा करून सरकारने भोंगे हटवावेत त्यानंतर आमचा कुठलाही त्रास होणार नाही असं म्हटलं होते. राज ठाकरेंनी दिलेल्या मुदतीनंतर अनेक मुस्लीम संघटनांनी राज ठाकरेंना धमकी दिल्याचं समोर आले होते. त्यातच आता राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असल्याने केंद्र सरकारने राज ठाकरेंना सुरक्षा पुरवण्याचा विचार सुरू केला आहे.

सध्या राज ठाकरेंकडे राज्य सरकारकडून देण्यात येत असलेली Y+ दर्जाची सुरक्षा आहे. त्यापूर्वी राज ठाकरेंना झेड प्लस सुरक्षा होती. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच त्यांनी अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कमी केली होती. त्यात राज ठाकरेंचाही समावेश होता. मात्र आता राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्वाचा नारा दिल्यानंतर त्यांच्यावरील धोका वाढल्याचं बोललं जात आहे. त्यात राज ठाकरेंना येणाऱ्या धमक्या आणि मेसेज यामुळे प्रशासकीय पातळीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.   

टॅग्स :मनसेराज ठाकरे